मुंबई-गोवा चौपदरी महामार्गावरील समस्यांबाबत शिष्टमंडळाने घेतली मुख्य अभियंत्यांची भेट
खेड : मुंबई -गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते, वाहतूक व इतर समस्यांबाबत कोकण विकास समितीमार्फत आज (दि. २९ डिसेंबर ) रोजी कोकण भवन येथे राष्ट्रीय महामार्ग मुख्य अभियंता संतोष शेलार यांना शिष्टमंडळामार्फत प्रस्ताव देवून सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मुख्य अभियंता यांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळामध्ये कोकण विकास समितीच्या वतीने जयवंतराव दरेकर, किशोर मोरे, प्रसाद धारसे, विशाल भावे, नेहाल पातेरे तसेच श्री. राकेश मोरे यांचा समावेश होता.
शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग मुख्य अभियंता यांना दिलेला प्रस्ताव आणि केलेली चर्चा याचे विवेचन खालीलप्रमाणे-
१) दासगाव जेट्टी – गोठे पूल आणि जोड रस्ता राष्ट्रीय मार्ग म्हणून तयार करण्याबाबत प्रस्तावसह विनंती केली असता संबंधित मंत्रालय यांच्याकडे पाठविण्यासाठी लागलीच शेरे नमूद केले.
२) माणगाव, इंदापूर बायपास रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण केले जाईल हे सांगून २०२३ अखेर मुंबई गोवा रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल, असेही सांगितले.
३) रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणे जेणेकरून सावली सोबत फळेही मिळतील आणि कोकणाची नैसर्गिकता टिकून राहील या कोंकण विकास समितीचे प्रस्तावावर आंबा, फणस, चिंच, जांभूळ, वड, उंबर, पिंपळ आदी प्रकारातील झाडेही लावली जातील असे सांगितले.
४) राष्ट्रीय महामार्गवर शौचालय, सुविधेबाबत तसेच मेगा हायवे वरील जंक्शन IRC नॉर्म प्रमाणे बनविनेबाबत निदर्शनात आणले जेव्हा हायवेवर शौचालय तयार केली जातील त्याचप्रमाणे हायवेचे रस्त्याचे काम पूर्ण होताच जंक्शन IRC नोर्म प्रमाणे बनविली जातील असे सांगितले.
५) खवटी व नातूनगरमध्ये महामार्गावर असलेले ‘तुळशी रोड जंक्शन’चे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्यासाठी कार्यकारी अभियंता यांना सूचना केल्या.