राजेंद्र म्हात्रे यांना कुलाबा जीवन गौरव पुरस्कार

उरण (विठ्ठल ममताबादे ) : स्व. मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, भाई जगताप मित्रमंडळ व ऍड.उमेश ठाकूर मित्रमंडळ तसेच युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विदयमाने दिल्या जाणा-या कुलाबा जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण सातीर्जे येथे शानदार सोहळयामध्ये कामगार नेते भाई जगताप यांच्या हस्ते करण्यांत आले.
यावेळी उरण मधील जेष्ठ पत्रकार व एन आय हायस्कूलचे निवृत्त शिक्षक राजेंद्र काशिनाथ म्हात्रे यांना कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या कार्यक्रम प्रसंगी प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. उमेश ठाकूर यांचा त्यांच्या वाढदिवसानिमीत्त यावेळी जाहीर सत्कार करण्यांत आला. यावेळी माजी आमदार रविंद्र धंगेकर, श्रीरामपूरचे नव निर्वाचीत आमदार हेमंत ओगले, कॉंग्रेसचे प्रदेश सचिव ऍड.प्रविण ठाकूर, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष राजाभाउ ठाकूर, माजी जि.प. प्रतोद काका ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे, स्व. मधुशेठ ठाकूर यांच्या पत्नी मालती ठाकूर, मिनाक्षी ठाकूर, कमल ठाकूर, जेष्ठ नेते तोडणकर गुरूजी, ऍड.प्रफुल्ल पाटील इ. उपस्थित होते.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कला, क्रिडा, पत्रकार, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला. यंदाचे कार्यक्रमाचे हे १५ वे वर्ष आहे.
ऍड. उमेशदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त सातिर्जे अलिबाग येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला. यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते व प्रेषक यांच्या साक्षीने महाराष्ट्रातील सुमारे ६० जणांना हा पुरस्कार देण्यात आला.
शिक्षक राजेंद्र म्हात्रे यांनी आपल्या सेवा काळात स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शन, साक्षरता अभियान, लोकसंख्या शिक्षण, चित्रकला स्पर्धा परीक्षा आयोजन व मार्गदर्शन, विज्ञान प्रदर्शन मार्गदर्शन, बालकवीता लेखन, पत्रकार म्हणून सामाजिक व शैक्षणिक बातमीपत्र लिहिणे, गरीब विद्यार्थी कल्याण निधी साठी महत्वाचे योगदान अशा अनेक उपक्रमात सहभाग घेउन मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेउन त्यांना कुलाबा जीवन गौरव राज्य स्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.