राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार : चंद्रशेखर बावनकुळे
मलकापूरच्या काँग्रेस अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश
मुंबई : काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या भूलथापांना आता राज्यातील मतदार भुलणार नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच विजय मिळवेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातील मलकापूर (ता. कराड) नगरपालिकेच्या काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये श्री. बावनकुळे बोलत होते. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला डॉ. अतुल भोसले, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने – कदम, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. मलकापूर नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण माजी सभापती गितांजली पाटील, माजी नगरसेविका स्वाती तुपे, अनिता यादव तसेच शहाजी पाटील, समीर तुपे, विजय चव्हाण, मल्लाप्पा बामणे, राजूभय्या मुल्ला यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी या कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या अपप्रचाराचा आणि खोटारडेपणाचा काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांनाही कंटाळा आला असून अनेक जण भाजपामध्ये येण्यासाठी उत्सूक आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्तेही भाजपामध्ये येत आहेत. संविधानासमोर नतमस्तक होऊन आपल्या तिस-या कार्यकाळाची सुरुवात करणा-या पंतप्रधान मोदी यांच्या शब्दावर मतदारांचा विश्वास आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांना मतदार त्यांची जागा दाखवून देतील आणि महायुतीला विजयी करतील असा विश्वास श्री. बावनकुळे यांनी व्यक्त केला.
- हे देखील वाचा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग धामणी येथे खचण्याची भीती
- दिल्ली आकाशवाणीकडून रत्नागिरीच्या अवधूत बाम यांना ‘टॉप ग्रेड’ प्रदान
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही उपलब्ध
- कोकणातून धावणारी ही गाडी झाली १५ ऐवजी २२ डब्यांची!