रेशनकार्ड समस्यांसंबंधी आदिवासी बांधवांनी घेतली तहसीलदारांची भेट
प्रश्न सोडविण्याचे तहसीलदारांकडून आश्वासन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर आणि सुनील जोशी यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यातील आदिवासी समाजातील कुटुंबांचे रेशन कार्ड सुरू करण्यासाठी उरण तहसील कार्यालय येथे मोठ्या संख्येने आदिवासी बांधव जमा झाले होते. त्या वेळेस तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, नायब तहसीलदार नरेश पेडवी, पुरवठा अधिकारी श्रीमती कविता रोकडे यांनी आदिवासी समाजातील लोकांचे रेशन कार्ड तातडीने सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यासाठी आवश्यक असलेली ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली.
आदिवासी लोकांना आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड , रेशन कार्ड, इ श्रम कार्ड, जातीचें दाखले, संजय गांधी योजना याकरिता चिरनेर ग्राम पंचायत कार्यालय येथे बुधवार दिनांक 11/01/2023 रोजी आणि उरण शहरात बुधवार दिनांक 18/01/2023 रोजी कॅम्प ठेवण्यात आला आहे. त्या कॅम्प मध्ये उरण तालुक्यातील 100% आदिवासी समाजातील लोकांचे सर्व प्रकारचे दाखले देण्यात येणार आहे.
आदिवासी समाज बांधवांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक राजेंद्र मढवी यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी आदिवासी बांधवांनी एकच जल्लोष केला.