संविधान टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची : आ. जाधव
गुहागर : भाजप कार्यकर्ते तुमच्या मनात शिरण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा सांगतील. यांनी रामाच्या नावाने जमवलेला निधी पळवला, विटा चोरल्या, मंदिराचा कळस बांधलेला नसताना प्राणप्रतिष्ठा केली. रामाच्या मंदिरात राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत असायला हवेत तीथे बाल्यावस्थेतील रामाची मूर्ती ठेवली. मोदीजी बाल रामाला हात धरुन मंदिरात नेत असल्याचे फोटो लावले. या गोष्टींना फसु नका. भाजपने देशाची संस्कृती नासवली आहे. देश वाचविण्यासाठी, संविधान टिकविण्यासाठी आणि पक्ष फोडणाऱ्या आणि चोरणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन आमदार जाधव यांनी केले.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमधील भवानी सभागृहात अनंत गीतेंच्या प्रचाराची सभा झाली. या सभेत बोलताना आ. जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मी प्रचारापासून दूर असल्याचा, नाराज असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. परंतु पक्षाने माझ्याकडे प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे. राज्यातील विविध मतदारसंघात प्रचाराच्या सभांना जात आहे. मात्र निवडणूक कोणतीही असो त्याचे काटेकोरपणे सुक्ष्म नियोजन आपण आजपर्यंत करत आलो आहोत.
यावेळी प्रत्येक गावात किती मतदान झाले, प्रवाही मतदान किती आहे, आपले मतदान कसे वाढेल याचा विचार गावागावातील कार्यकर्त्यांना सोबत घेवून केला आहे. मुस्लीम समाजाची 90-95 टक्के मते मिळावीत म्हणून मुस्लीम कार्यकर्त्यांची स्वतंत्र कमिटी, बौद्ध समाजाची कमिटी, गावाची कमिटी, प्रत्येक गावावर लक्ष ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांची स्वतंत्र कमिटी असे नियोजन करुन काम सुरु आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील प्रमुख कार्यकर्त्यांद्वारे हे नियोजन प्रत्यक्षात अंमलात आणले जात आहे. त्यांच्याकडून मला अहवाल मिळतो. अडचणी सोडवतो. निवडणुकीच्या कामात मी पणा ठेवत नाही. हे सारे तुम्हा सर्वांना माहीती आहे. विधानसभा क्षेत्रात एकही गाव असे नाही जीथे मी निधी दिला नाही. माझे काम मी चोख केले आहे. आता त्यांचे मतदानातून प्रत्यंतर देण्याचे काम तुमचे नाही का. कोरोना काळात मदतीला धावणाऱ्या, तुमच्या सुखदु:खात सहभागी होणाऱ्या, आमदारासाठी तुम्ही हे कराल याचा विश्र्वास आहे, असेही आमदार भास्कर जाधव म्हणाले