आंबोली कावळेसाद पॉईंटवर कोल्हापूरचा तरुण दरीत कोसळला

सावंतवाडी : आंबोली जवळील गेळे येथील कावळेसाद पॉईंटवर काल शुक्रवारी सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली आहे. कोल्हापूर येथील 45 वर्षीय राजेंद्र बाळासो सनगर (रा. चिले कॉलनी) नावाचा तरुण खोल दरीत कोसळला. ही घटना सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली असून, त्याचा शोध घेण्याचे काम शुक्रवारी थांबवण्यात आले आहे. आज शनिवारी सकाळी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र सनगर हे रेलिंगच्या जवळ फोटो काढत असताना त्यांचा पाय घसरला आणि तोल जाऊन ते थेट दरीत कोसळले. कावळेसाद पॉईंट येथील दरी सुमारे 300 ते 400 फूट खोल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र सनगर आपल्या कोल्हापूरच्या 22 मित्रांसह आंबोली- गेळे परिसरात पर्यटनासाठी आले होते. ते कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती शिक्षण विभागात सरकारी नोकरीत असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. कावळेसाद पॉईंटवर दाट धुक्यात आणि वाऱ्यावर मौजमजा करत असताना त्यांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी रेलिंगजवळून पाय घसरून ते दरीत कोसळले असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना दिली, असे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.
घटनास्थळी दाट धुके, वाऱ्यासह पाऊस आणि मोबाईल रेंजचा अभाव यामुळे शोधकार्य हाती घेण्यास मोठे अडथळे येत आहेत. आज शनिवारी सकाळी बाबल आल्मेडा रेक्सू टीमने पुन्हा शोधमोहीम हाती घेतली आहे.