रत्नागिरी बनतेय पुतळ्यांची नगरी!

- रत्नागिरी शहराचे सौंदर्य खुलवण्यासाठी आणखी तीन पुतळे दाखल
रत्नागिरी : अलीकडच्या काही वर्षात रत्नागिरीचा चेहरा-मोहरा पार बदलून गेला आहे. रत्नदुर्ग किल्ल्यावर शिवसृष्टीची उभारणी, शहराच्या माळनाका भागातील तारांगण, शिर्के उद्यानाचे सुशोभीकरण, तसेच थिबा राजवाड्याच्या पार्श्वभूमीवर थ्रीडी मल्टीमीडिया शो ने रत्नागिरी शहराच्या सौंदर्यात भर घातली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सावळ्या विठुरायाचा ध्यानाकर्षक पूर्णाकृती पुतळा येणा-जाणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असतानाच आता महाराष्ट्राला लाभलेल्या आणखी तीन थोर पुरुषांचे विशालकाय पुतळे रत्नागिरीवासीयांचं लक्ष वेधून घेणार आहेत. रत्ननगरीचे सौंदर्य खुलवण्यासाठी हे तीन पुतळे शुक्रवारी दि. 25 जुलै ) सकाळीच रत्नागिरीत दाखल झाले आहेत.
महाराष्ट्राचा इतिहास नव्या पिढीपर्यंत रुजवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाने बनवण्यात आलेले थोर पुरुषांचे पुतळे राज्यात ठिकठिकाणी उभारले जात आहेत रत्नागिरी शहरही याला अपवाद राहिलेले नाही.
राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने रत्नागिरी शहरात या आधी माळ नाका येथील शिर्के उद्यानात श्री विठ्ठलाची विशालकाय पूर्णाकृती मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. त्याआधी थिबा पॉईंट येथे छत्रपती संभाजी राजांचा पुतळा शिवकालीन पराक्रमाची साक्ष देत उभा राहिला आहे. जेलरोड समोरील कॉलेज रोड येथील कॉर्नरवर बसविण्यात आलेले तुलसी वृंदावनाचे शिल्प देखील लक्ष वेधून घेत आहे. याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिल्हा रुग्णालयासमोरील पुठळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी शहरातील तारांगण तसेच शिर्के उद्यान परिसरात आणखी तीन विशालकाय पुतळे दाखल झाले आहेत. तारांगण परिसरातच हे पुतळे स्थापित केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर तसेच अन्य एका थोर पुरुषाचा असे एकूण तीन पुतळे दाखल झाले आहेत. लवकरच या पुतळ्यांचे अनावरण केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शहरात विविध ठिकाणी स्थापित केल्या जाणाऱ्या थोर पुरुषांच्या पुतळ्यांमुळे ‘रत्ननगरीची ओळख आता पुतळ्यांची नगरी’ अशी होऊ लागली आहे.