दापोलीत सायकल फेरी काढून घेतली कृषी तंत्रज्ञानाची माहिती!
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त दापोलीत निघाली सायकल फेरी
दापोली : देशभर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे रोजी साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस आहे. या निमित्ताने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी, ७ मे २०२३ रोजी सायकल फेरी काढण्यात आली. या सायकल फेरी दरम्यान डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील फळ व भाजीपाला प्रक्रिया केंद्राला भेट देऊन तिथे वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती करुन घेण्यात आली.
या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली, उदयनगर, लष्करवाडी, आनंदनगर, पांगारवाडी, नर्सरी रोड, फळ आणि भाजीपाला प्रक्रिया केंद्र, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, आझाद मैदान असा ६ किमीचा होता. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. फळ प्रक्रिया केंद्र, फळ शास्त्र विभाग येथे डॉ राजेंद्र आग्रे, सचिन पाटोळे आणि सहकारी यांनी आंबा, काजू, फणस, जांभूळ, करवंद, आवळा, कोकम, चिकू इत्यादी वेगवेगळ्या फळांवर प्रकिया करुन बनवले जाणारे पदार्थ, त्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यापीठात संशोधन करुन तयार केलेल्या आंब्याच्या व इतर फळांच्या विविध प्रजांतींबद्दल माहिती दिली. सर्वांनी येथे बनलेल्या काजू बोंडाच्या सरबताचा आस्वाद घेतला.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात राहुल मंडलिक, प्रशांत पालवणकर, अंबरीश गुरव, विनय गोलांबडे, राकेश झगडे, रागिणी रिसबूड इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.