संगमेश्वरच्या चाफवलीतील नीतीन बोडेकरची ‘इस्रो’कडे भरारी!
दुर्गम भागात राहून प्रतिकूल परिस्थितीत मिळवले यश
नाणीज : दुर्गम भागातील गरीब कुटुंबात राहणारा, शाळेसाठी रोज ६ किलो मीटरची पायपीट करणारा, घरी गेल्यावर घरच्यांना कामे करू लागणारा चाफवली शाळा नंबर १ चा विद्यार्थी नितीन अनंत बोडेकर याची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे. अनेक अवघड चाळणी परिक्षातून त्याची निवड झाली आहे. त्याचे गाव चाफवली भोयरेवाडी व शाळेसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
अंतराळाचा अभ्यास करणार्या अमेरिकेतील नासा व भारतातील इस्रो या संस्थांच्या भेटीसाठी ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांमधून संशोधक, शास्त्रज्ञ निर्माण होण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी जिल्हास्तरावरून पात्र ठरलेल्या ९० विद्यार्थ्यांपैकी परिक्षेतून एकूण २७ विद्यार्थी अंतिम निवडीसाठी पात्र ठरले आहेत. त्यातील ९ विद्यार्थी ‘नासा’तर २७ विद्यार्थी ‘इस्रो’ या संस्थांच्या भेटीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून निवडण्यात आले आहेत.’जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान’ या या उपक्रमांतर्गत ही निवड झाली आहे. त्याला जिल्हा परिषद शाळा चाफवली नंबर १ चे मुख्याध्यापक शिंदे सर, श्री ओमासेसर तसेच सौ शिंदे व सौ कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या बाबतची माहिती अशी की, अंतराळाचा अभ्यास करणार्या नासा, इस्त्रोसारख्या संस्थांना भेटी देण्याचा उपक्रम रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून हाती घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या २५१ केंद्रातील पावणेतीन हजार शाळांमधील ३० नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या चाळणी परिक्षेला २७ हजार विद्यार्थ्यांपैकी २३ हजार ७१९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार ६४०विद्यार्थी बीटस्तरीय परिक्षेसाठी निवडण्यात आले. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांमधून संशोधक, शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा परिषदेने नासा, इस्रो भेटीचा उपक्रम राबवला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, अतिरिक्त सीईओ परिक्षित यादव, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांच्यासह संदीप कडव, मुरकुटे यांच्यासह अन्य अधिकार्यांनी विद्यार्थी निवडीचे नियोजन केले.
या संस्थांना भेटीसाठी घेण्यात आलेल्या बीटस्तरासाठी २६०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्या परीक्षेतून तालुकास्तरासाठी ५६० विद्यार्थी पात्र ठरले. तालुकास्तरावर झालेल्या परीक्षेतून जिल्हास्तरासाठी ९० विद्यार्थी निवडण्यात आले. मुलाखत स्वरूपात होणारी निवड परीक्षा २० डिसेंबरला जिल्हा परिषदेत ठेवण्यात आली होती. ही चाचणी घेण्यासाठी विज्ञान विषयातील १५ तज्ञ अध्यापक नियुक्त केले होते. त्यांची पाच पथके तयार करून त्यांनी इस्रोसाठी २७ तर नासासाठी त्यातील प्रत्येक तालुक्यातील एक या प्रमाणे ९ विद्यार्थी निवडले. यामध्ये विद्यार्थिनींचाही समावेश आहे. एका पथकात ३ तज्ञांचा समावेश करण्यात आला होता. पारदर्शकतेसाठी या प्रकियेचे व्हिडिओ शूटिंग केले गेले. या निवडीसाठी विद्यार्थ्यांची मुलाखत स्वरूपात १०० गुणांची परीक्षा घेण्यात आली. परीक्षा झाल्यानंतर लगेचच निवडलेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली. अमेरिकेन ऍम्बिसिकडून व्हिसासाठीची परवानगी प्राप्त झाली की नासा भेटीसंदर्भातील तारखा निश्र्चित केल्या जाणार आहेत. तोपर्यंत विद्यार्थी निवड प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
अश्याच कडक चाचण्यातून नितीन बोडेकर या विद्यार्थ्याची निवड झाली आहे.तो अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत आहे. तो चाफवली येथील शाळा नंबर एकचा विद्यार्थी आहे. शाळेत येण्या-जाण्यासाठी त्याला सहा किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. घरी गेल्यानंतर घरची कामे करावी लागतात त्यातून अभ्यासाला वेळ काढून त्यांने हे यश संपादन केले आहे.
याबद्दल त्याचे देवरूखचे गटशिक्षणाधिकारी पाटील उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे, शाळेचे शिक्षक अश्या सर्वांनी त्याचे अभिनंदन केले आहे.