जगाच्या पाठीवरराष्ट्रीयस्पोर्ट्स

तीन ‘सी’ तायक्वांदोमध्ये यशस्वी होण्यासाठी गरजेचे :
आंतरराष्ट्रीय पंच नवीनचंद्र

रत्नागिरी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे रत्नागिरीमध्ये प्रथमच पंच परीक्षेचं आयोजन करण्यात आलं. इथलं आयोजन हे एक रोल मॉडेल असून बाकीच्या आयोजकांनी ते जरूर अवलंबाव असे कौतुकास्पद उद्गार या परीक्षेसाठी प्रशिक्षक म्हणून आलेल्या आंतरराष्ट्रीय पंच नवीनचंद्र यांनी काढले.खेळामुळे व्यक्ती घडत असते आणि व्यक्तिमत्व विकास देखील होत असतो. कमिटमेंट, कन्सिस्टन्सी आणि कम्युनिकेशन हे तीन सी तायक्वांदोमध्ये यशस्वी होण्यासाठी गरजेचे आहेत. प्रत्येकाने हे आचरणात आणावेत असा कानमंत्रही त्यांनी दिला.


बेंगलोरमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले नवीनचंद्र हे इयत्ता चौथीत असताना तायक्वांदोशी जोडले गेले. खेळाडू, स्वतःची अकादमी ते आंतरराष्ट्रीय पंच ह्या प्रदीर्घ प्रवासात आईवडिलांनी भक्कम पाठिंबा दिला. आपल्या यशात प्रशिक्षक पी.एल एन. मूर्ती आणि श्रीनाथ प्रल्हाद यांचा फार मोठा वाटा असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, भारतातील तायक्वांदो आता जागतिक स्तरावरच्या तायक्वांदोसोबत पुढे जात आहे. मात्र अद्यापही कराटे आणि तायक्वांदो यातील फरक अनेकांना समजत नाही. त्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचून या खेळाच नेमकेपण समजावून सांगणं गरजेचं आहे. भारतात गुणवत्तेची कमी नाही त्याला राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली तर निश्चितच भारतातील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला तिरंगा फडकवू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


येणाऱ्या पाच वर्षात ऑलिम्पिकमध्ये भारताच स्थान आघाडीवर आणण्याचं ध्येय असेल असं प्रतिपादन नवीनचंद्र यांनी केलं. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने पुमसे आणि क्योरोगी दोन्ही प्रकारात आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम बघणारे नवीनचंद्र यांनी जागतिक पातळीवर टॉप सिक्समध्ये येण्याचा बहुमान मिळवला. जे ज्ञान मला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळाल आहे ते आता भारतातील प्रत्येक इच्छुक खेळाडू पर्यंत ते पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत अस त्यांनी आवर्जून सांगितलं.


खेळाडूंच्या आहाराबद्दल बोलताना, जगातली प्रत्येक आई ही आपल्या मुलासाठी उत्तम आहार तज्ञ असते. आपल्या घरात शिजवलेलं ताजं,सकस अन्न हाच उत्तम आहार असून त्या व्यतिरिक्त खेळाडूंना कोणत्याही विशिष्ट आहाराची गरज नाही अस त्यांनी सांगितलं. खेळाडूंनी जंक फूड खाणं टाळावं असा सल्ला देतानाच, मुलं मुली नैसर्गिकरित्या आपल्या वयानुसार ज्या ज्या वजनी गटात असतील त्याच वजनी गटात त्यांनी खेळावं हेही ते म्हणाले. उपलब्ध साधन कोणती आहेत यापेक्षा तुमची आत्मसात करण्याची शक्ती किती उत्तम आहे यावरच तुमचा खेळ बहरतो या मुद्द्याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधलं.

मुलांच्या तुलनेत मुलींना आंतरराष्ट्रीय पंच होणे अधिक सोप आहे. त्यामुळे मुली केवळ अठरा वर्षे पूर्ण आणि फर्स्ट दान ब्लॅक बेल्ट झाल्या की, आपल्या गुणवत्तेवर आंतरराष्ट्रीय पंच म्हणून परीक्षेत यश मिळवून काम करू शकतात. या संधीकडे मुलींनीही अधिक गांभीर्याने बघायला पाहिजे

नवीनचंद्र, आंतरराष्ट्रीय पंच.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button