मालगुंड समुद्रकिनारी भलामोठा मृत व्हेल मासा सापडला

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे नजीकच्या मालगुंड येथील गायवाडी समुद्रकिनारी भला मोठा व्हेल मासा मृतावस्थेत आढळला. काही दिवसांपूर्वीच या माशाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. समुद्राच्या लाटांबरोबर वाहत आलेला हा मासा समुद्रकिनार्यावर पोहोचला. मात्र, तो प्रचंड मोठा असल्याने लाटांमध्ये अडकून राहिला. समुद्राची ओहोटी सुरू झाल्यानंतर या माशाचा मृतदेहाचे धूड गुरुवारी सकाळच्या सुमारास समुद्रकिनार्यावरील स्थानिक व्यावसायिक तसेच ग्रामस्थांच्या निदर्शनात आले.
या घटनेची माहिती स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांनी गणपतीपुळे पोलिस चौकीला दिली. या घटनेची माहिती मिळताच गणपतीपुळे पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक गावीत, पोलिस हेड कॉन्स्टेबल भागवत व त्यांचे सहकारी तसेच वन विभागाचे वनक्षेत्रपाल कांदळवन किरण ठाकूर, वनरक्षक आकाश कडू, प्राजक्ता चव्हाण, शुभम भाटकर, प्रकल्प समन्वयक पशुधन पर्यवेक्षक नीलेश वाघमारे आणि कासव मित्र आदर्श मयेकर (मालगुंड) यांनी ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्या नंतर मृत मासा किनार्यावरून बाहेर काढण्यासाठी पोलीस व वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक व्यावसायिक ग्रामस्थांनी एकत्रितपणे मदत केली. त्या नंतर वनविभागाने घटनास्थळी मोठा खड्डा काढून या मृत माशाची गुरुवारी दुपारच्या सुमारास योग्य ती विल्हेवाट लावली.