कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या राजधानी, दुरंतो एक्सप्रेससह चार गाड्यांचे मार्ग बदलले
उद्याची उधना-मंगळूरु होळी विशेष गाडी वलसाड येथून सुटणार
रत्नागिरी : सुरतजवळील उधना रेल्वे यार्डातील री-मॉडेलिंगच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या राजधानी तसेच दुरंतो एक्सप्रेससह लांब पल्ल्याच्या एकूण चार गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. याच बरोबर उधना ते मंगळूर दरम्यान दि. ५ मार्च २०२३ रोजी धावणारी होळी स्पेशल गाडी उधना जंक्शन ऐवजी त्या आधीच्या वलसाड स्टेशन वरून मंगळुरूसाठी निघणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या सुरजजवळील उधना रेल्वे यार्डात मॉडेलिंग चे काम दिनांक 3 ते 6 मार्च दरम्यान चालणार आहे. या कामाचा परिणाम रेल्वेच्या काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवर झाला आहे.
या संदर्भात रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक पाच मार्च रोजी उधना ते मंगळूर दरम्यान धावणारी होळी स्पेशल ट्रेन (09057) वलसाड स्टेशन वरून कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी निघणार आहे.
याचबरोबर या मार्गावरून कोकण रेल्वेच्या मार्गावर येणाऱ्या चार गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. दिनांक पाच मार्च रोजी सुटणारी हजरत निजामुद्दीन ते तिरुअनंतपुरम (12432) ही राजधानी एक्सप्रेस नागदा, भोपाळ जंक्शन, इटारसी, भुसावळ, कल्याण, पनवेल मार्गे कोकण रेल्वे मार्गावर येणार आहे.
दि. 4 मार्च रोजी प्रवास सुरू होणारी व 12284 क्रमांकासह धावणारी निजामुद्दीन – एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस राजधानी एक्सप्रेस वळवलेल्या मार्गाने कोकण रेल्वे मार्गावर येणार आहे. याशिवाय कोचुवेली – चंदीगड (12217) ही दिनांक 4 मार्च रोजी प्रवास सुरू होणारी गाडी पनवेलनंतर कल्याण, भुसावळ , इटारसी भोपाळ मार्गे दिल्लीला जाणार आहे. दिनांक 4 मार्च 2023 रोजी प्रवास सुरू होणारी कोचुवेली ते श्रीगंगानगर एक्सप्रेस पनवेलनंतर वसई मार्गे न जाता कल्याण खांडवा, इटारसी, भोपाळ जंक्शन, नागदा, रतलाम मार्गे चंदिगडला जाणार आहे.