अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी गुणवत्ता यादी जाहीर

रत्नागिरी : बहुप्रतिक्षित इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची (Class 11 th Online Admission Process)गुणवत्ता यादी जाहीर झाली असून पहिल्या प्रवेश फेरी (First Entry Round) अंतर्गत 6 लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कॉलेज अलॉट करण्यात आले आहेत. त्यात कला शाखेच्या 1 लाख 49 हजार 791 विद्यार्थ्यांचा, वाणिज्य शाखेच्या 1 लाख 39 हजार 602 विद्यार्थ्यांचा तर विज्ञान शाखेच्या 3 लाख 42 हजार 801 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटला तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता.राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे राबवली जात असलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली जात होती. मात्र,त्यावर रात्रंदिवस काम सुरू होते. अखेर प्रवेशाची गुणवत्ता यादी शनिवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आली. शिक्षण विभागाने प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 30 जून ते 7 जुलै या कालावधीत प्रत्यक्ष प्राप्त महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या प्रवेश फेरीसाठी 10 लाख 66 हजार 5 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यात कला शाखेच्या 2 लाख 31 हजार 356 विद्यार्थ्यांनी तर वाणिज्य शाखेच्या 2 लाख 24 हजार 931 विद्यार्थ्यांनी आणि विज्ञान शाखेच्या 6 लाख 9 हजार 718 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. अर्ज केलेल्या 10 लाख 66 हजार 5 विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पसंती क्रमांकानुसार पहिल्या फेरीसाठी कॉलेज अलॉट करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्यासाठी 10 पर्याय उपलब्ध होते. त्यानुसार 4 लाख 57 हजार 841 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पहिल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाला आहे.तर 77 हजार 99 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या दुसरा पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाला.