गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवाशांची कोकण रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी
गर्दीवर नियंत्रण मिळवताना आरपीएफच्या नाकी नऊ!
रत्नागिरी : पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देऊन मुंबईकडे परतीच्या प्रवासाला लागलेल्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे कोकण रेल्वेला आरपीएफचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करावा लागला आहे. शनिवारी झालेल्या गौरी गणपती विसर्जनानंतर त्याच दिवशी सायंकाळपासून चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासासाठी मिळेल ती गाडी पकडून मुंबईच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली, रत्नागिरी,संगमेश्वर, चिपळूणसह खेड स्थानकावर रविवारी विसर्जनानंतरच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
गणेशोत्सवाला गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वेने नियमित गाड्यांसोबतच गणपती स्पेशल गाड्यांच्या शेकडो फेऱ्यांचे नियोजन केले आहे. मात्र, वाहतुकीवरील ताण वाढल्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. यामुळे अनेक गाड्या या निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने धावत आहेत.
रत्नागिरी, चिपळूणसह खेडला तोबा गर्दी
शनिवारी झालेल्या विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाच्या पहिल्याच दिवशी रविवारी कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी संगमेश्वर, चिपळूण तसेच खेड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. गाडीत शिरायला देखील जागा नसल्यामुळे खेड स्थानकावर लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसमध्ये अनेक प्रवासी सामानासुमानासह एसएलआर-ट्रेन मॅनेजरच्या कोच मध्ये चढले. रेल्वे कर्मचारी तसेच आरपीएफच्या जवानांनी सांगून देखील प्रवासी ऐकत नसल्याने अखेर रेल्वेने आर पी एफ च्या जवानांना गार्डच्या डब्याकडे पाठवून त्या डब्यात चढलेल्या प्रवाशांना खाली उतरवले.
फलाटाला लागताच मेमू गाडी काही क्षणात भरली!
यावेळी कोकण रेल्वेने गर्दीचे नियोजन करण्यासाठी चिपळूण रत्नागिरी तसेच काही दिवसापूर्वी खेडसाठी देखील तेथून सुटणाऱ्या मेमू ट्रेनचे नियोजन केले आहे. खेड येथून पनवेलसाठी सोडण्याकरता रिकामी मेमू ट्रेन कारवार-मडगाव येथून रविवारी सकाळीच खेड स्थानकावर दाखल झाली होती. दुपारी खेड येथून पनवेलसाठी स्वतंत्र मेमू गाडी सुटणार असल्याची कल्पना आधीच असल्यामुळे परतीच्या प्रवाशांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे सकाळी आलेली ही गाडी दुपारी सुटणार असली तरी प्रवाशांनी आधीच या गाडीत आपली जागा पटकावली होती.