जगातल्या सर्वात उंच चिनाब पुलावरून वंदे भारत एक्सप्रेस धावणार!
उधमपूर : भारतीय रेल्वेने काश्मीर खोऱ्यात चिनाब नदीवर उभारलेल्या जगातील सर्वात उंच पुलावरून वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात उंच आणि अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीवर मात करून उभारलेल्या या पुलाचे डिझाईन कोकण रेल्वेने केले आहे.
जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब रेल्वे पुलावरून रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या उपस्थितीत ट्रॅक माउंटेड व्हेइकल अर्थात रेल्वे ट्रॉली रविवारी धावली. या निमित्ताने रेल्वेमंत्री यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. प्रकल्प जानेवारी २०२४पर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर यावरून रेल्वे वाहतूक सुरू होणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
वंदे भारत एक्स्प्रेसच्या देखभालीसाठी काश्मीर खोऱ्यातील बडगाम जिल्ह्यात देखभाल सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. शहरांतर्गत प्रवास वेगवान आणि सुरक्षित होण्यासाठी वंदे भारत मेट्रोची बांधणी करण्यात येणार आहे.
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प (USBRL) पूर्णतः कार्यान्वित झाल्यावर वंदे मेट्रो जम्मू आणि श्रीनगरमध्ये चालवली जाईल, असेही वैष्णव यांनी जाहीर केले.
चिनाब नदीच्या पुलाच्या बांधकाम साइटवरून माध्यमांशी बोलताना वैष्णव यांनी शेअर केले की USBRL प्रकल्प डिसेंबर 2023 किंवा जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.