नेत्रावती,मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या संगमेश्वर थांब्यासाठी उद्या होणारे उपोषण स्थगित
आंदोलनाची पुढील तारीख लवकरच जाहीर करणार : संदेश जिमन
रत्नागिरी : नेत्रावती तसेच मस्त्यगंधा एक्स्प्रेस गाड्यांना कोकण रेल्वेच्या संगमेश्वर रोड स्थानकात थांबा मिळण्यासाठी होणारे आमरण उपोषण तूर्त पुढे ढकलण्यात आले आहे. विधान परिषदेच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू असल्यामुळे स्थानिक पोलिस प्रशासनाने दिलेल्या नोटिसीच्या पार्श्वभूमीवर २६ रोजी होणारे उपोषण तूर्त लांबणीवर टाकण्यात आले आहे. उपोषणाची पुढील तारीख लवकरात जाहीर करण्यात येणार असल्याचे उपोषणाचा इशारा दिलेल्या संदेश जिमन व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.
भारतीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेची जागा निवडणुकीद्वारे भरण्यासाठी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या दि. 28 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील संपूर्ण क्षेत्रात दि.४ फेब्रुवारी 2023 पर्यंत आचारसंहिता लागू केली आहे.
स्थानिक पोलीस प्रशासनाने या आचारसंहितेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखणेहेतु फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 149 प्रमाणे संगमेश्वर रेल्वे स्थानकात होणाऱ्या या आंदोलनाविषयी नोटीसही दिली आहे.
प्रजासत्ताक दिनी गुरुवारपासून होणारे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले असले तरी संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या आणि जनतेच्या मागण्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा आम्ही सुरूच ठेवणार आहोत.
संदेश जिमन, आंदोलनकर्त्यांचे प्रमुख.
जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा यावर निवडणूक काळात पडणारा ताण आम्ही जाणतो. ही सर्व मंडळी प्रशासकीय सेवेत असली तरी या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याची त्यांची जबाबदारीही वाढते. त्यामुळे आम्ही हे उपोषणाचे आंदोलन तुर्तास पुढे ढकलत असून उपोषणाची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे उपोषणाची हाक दिलेल्या संघटनेकडून सांगण्यात आले