स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय

- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुविधा : सहायक आयुक्त इनुजा शेख
रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्यामार्फत वाचनालय सुरु करण्यात आले असून, या वाचनालयामध्ये यूपीएससी, एमपीएससी, पोलीस भरती, स्टाफ सिलेक्शन कमिशन, तलाठी भरती, बँकीग अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या दर्जेदार व उपयुक्त पुस्तकांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांसाठी येथे शांत, प्रेरणादायी आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू असलेल्या या अभ्यासिकेचा लाभ घेणे ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
ही सुविधा पूर्णतः मोफत आहे. जिल्ह्यातील सर्व इच्छुक विद्यार्थी आणि करीअरसाठी सज्ज होणा-या युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.*
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी श्रीमती शेख यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, सर्व युवक व विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी या वाचनालयाचा पुरेपुर लाभ घ्यावा आणि आपली स्पर्धा परिक्षा तयारी अधिक बळकट करावी. शासनाच्या वतीने उपलब्ध करण्यात आलेल्या या सुविधा म्हणजे यशाकडे वाटचाल करण्याचे मजबूत पाऊल आहे. योग्य जागा, आवश्यक साहित्य आणि एकाग्रतेस पूरक वातावरण या ठिकाणी सहज अनुभवता येते.
हे वाचनालय विद्यार्थ्यांच्या यशाच्या दिशेने मार्गदर्शन करणारे ठरणार आहे.
या वाचनालयामध्ये जिल्हयातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची आणि प्रेरणादायी योजना राबविण्यात येत आहे. ही सुविधा त्यांच्या अभ्यासात गती आणणारी आणि एकाच ठिकाणी सर्व संसाधनाची उपलब्धता देणारी आहे. योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार ग्रंथसंपदा हे यशाचे मुलभूत घटक असून ते आता एका ठिकाणी सहज उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यानी या संधीचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नांकडे आत्मविश्वासाने वाटचाल करावी.