ब्रेकिंग न्यूजरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत पावसाळ्यात मुंबई-गोवा वंदे भारतसह तेजस एक्सप्रेस रद्द?

  • मान्सून वेळापत्रकाची नोंद प्रवासी आरक्षण प्रणालीत न केल्यामुळे १० जूनपासून रद्दचा रिमार्क
  • डबल डेकरच्या जागेवर चालणाऱ्या गाडीचे आरक्षणही पावसाळ्यात दाखवते बंद


रत्नागिरी : प्रवासी सुरक्षेसाठी कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते. या अंतर्गत सर्व गाड्या नियंत्रित वेगाने चालवल्या जातात. यामुळे प्रवास वेळेत वाढ होते. याचा सर्वात जास्त परिणाम सुपरफास्ट गाड्यांवर होऊन एका दिवसात मुंबईहून गोव्यात जाऊन परत येणाऱ्या गाड्यांचे आठवड्यातील दिवस कमी होतात. पावसाळी वेळापत्रकानुसार तेजस एक्सप्रेस आठवड्यातून पाच ऐवजी तीन तर वंदे भारत एक्सप्रेस सहा ऐवजी तीन दिवस धावते.

भारतीय रेल्वेवर नियमित गाड्यांचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवस आधी सुरु होते. त्यामुळेच पावसाळी वेळापत्रकात होणारे बदलही आरक्षण प्रणालीत तेव्हाच नोंद होणे अपेक्षित आहे. परंतु तसे अद्यापतरी झालेले नाही. त्यामुळे आज २२ ऑगस्ट, २०२४ साठीचे आरक्षण सुरु झाले असले तरी अजूनही २२२२९/२२२३० मुंबई मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेस, २२११९/२२१२० मुंबई मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस यांसारख्या प्रीमियम गाड्यांसोबतच ११०९९/१११०० लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या तीन जोडी गाड्यांचे आरक्षण ९ जून, २०२४ नंतरचे (१० जूनपासूनचे) आरक्षण सुरु झालेले नाही.

याबाबत IRCTC वर (म्हणजेच प्रवासी आरक्षण प्रणाली – PRS वर) प्रवाशांना दाखवण्यात येत असणारा संदेशही चुकीचा असून त्यावर TRAIN CANCELLED असे नमूद केलेले आहे. त्यामुळे या गाड्या जूनपासून रद्द करण्यात आल्या आहेत का अशी शंका प्रवाशांना येत आहे. त्यातच पुढील दहा दिवसांत कोकणात सर्वांत महत्वाच्या असणाऱ्या सणाच्या दिवसांतले म्हणजेच गणेशोत्सव काळातले आरक्षण सुरु होणार आहे. त्या पार्शवभूमीवर मध्य आणि कोंकण रेल्वेने लवकरात लवकर पावसाळी वेळापत्रकाची नोंद प्रवासी आरक्षण प्रणालीत करून सर्व गाड्यांचे आरक्षण सुरु करण्याची गरज आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button