सीएसएमटी ते कन्याकुमारी कोकण रेल्वे मार्गे सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार!
‘दादर -रत्नागिरी’ सोडायला जागा नाही ; ‘कन्याकुमारी’ साठी स्लॉट, प्लॅटफॉर्म सर्व काही आहे ; रेल्वेचा कोकणबाबत दुजाभाव
रत्नागिरी : दादर-रत्नागिरी गाडी दादरवरूनच सोडावी, रत्नागिरी तसेच चिपळूण, सावंतवाडीकरिता आणखी गाड्यांची मागणी याकडे सतत दुर्लक्ष करणाऱ्या कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेकडे कोकणातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावरून ‘साऊथ’ साठी गाड्या सोडायला स्लॉट तसेच फलाट सर्व काही उपलब्ध आहे. फक्त कोकणसाठीच नाही, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई सीएसएमटी ते कन्याकुमारी तसेच तीही कमी पडली म्हणून लो. टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी दरम्यान कोकणातून धावणाऱ्या सुपरफास्ट गाड्या जाहीर करून रेल्वेने कोकणवासीयांना एक प्रकारे डीवचले आहे.
मुंबईतील सीएसएमटी ते कन्याकुमारी अशा कोकण रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या ज्यादा सुपरफास्ट गाड्या रेल्वेने शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. दरम्यान, त्या आधीपासून कोरोनाच्या नावाखाली दादर येथून रत्नागिरीसाठी सुटणारी व सध्या तिथून न सोडता गैरसोईच्या दिवा येथून सोडली जात असलेली रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादर येथून सोडावी या मागणीला मध्य तसेच कोकण रेल्वे केराची टोपली दाखवली आहे. मात्र त्याचवेळी लोकांनी मागणी करण्याआधीच मुंबई सीएसएमटी ते कन्याकुमारी, मागील दोन अडीच -तीन वर्षांपासून सतत विस्तार केली जाणारी जबलपूर- कोईमतुर विशेष एक्सप्रेस अशा गाड्या चालवण्यासाठी कोकण रेल्वेचा मार्ग सतत मोकळा आहे. फक्त अडचण रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग, सावंतवाडीसाठी गाड्या चालवाव्यात अशी मागणी केल्यावर रेल्वेपुढे निर्माण होत आहे. त्यामुळे या विरोधात आता कुठल्याही विरोधाशिवाय सहजासहजी कोकण रेल्वेला जमिनी दिलेल्या जनतेने याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबई सीएसएमटी ते कन्याकुमारी (01461/01462) ही सुपरफास्ट एक्सप्रेस दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी सीएसएमटी येथून सायंकाळी साडेतीन वाजता सुटून दुसऱ्या दिवशी कन्याकुमारीला रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी पोहोचणार आहे. कन्याकुमारी येथून ही गाडी दिनांक 7 जानेवारी २०२३ रोजी दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल आणि मुंबईत सी एस एम टी दुसऱ्या दिवशी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल.
मुंबईतून कन्याकुमारीसाठी अजून एक सुपरफास्ट गाडी (01463/01464) धावणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस वरून दिनांक 12 व 19 जानेवारी २०२३ रोजी दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ती कन्याकुमारीला अकरा वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल. कन्याकुमारी वरून ही गाडी (01464) दिनांक 14 व 21 जानेवारी 2023 दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल आणि मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला ती दुसऱ्या दिवशी रात्री 9.21वाजता पोहोचेल.
कन्याकुमारी सुपरफास्ट एक्सप्रेसचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, मडगाव, कारवार, उडपी, मंगळुरू, कासारगोड, कन्नूर, तेलीचेरी, कालिकत, तीरुर, शोरनूर, त्रिशूर, एर्नाकुलम, कोटीयम, तिरूवल्ला, चेनगन्नूर, कन्याकुलम, कोळम, तिरुअनंतपुरम, कुली तुराई नागरकोईल.
वातानुकूलित स्लीपर तसेच सेकंड सीटिंग अशा एकूण 17 डब्यांसह ही सुपरफास्ट गाडी कोकण रेल्वे मार्गे धावणार आहे
दादर -चिपळूण, दादर -सावंतवाडी, वसई -सावंतवाडी गाड्या चालवताना टाळाटाळ करणारं रेल्वे प्रशासन कन्याकुमारीसाठी सर्व अडचणींवर मात करायला तत्पर आहे. म्हणजे महाराष्ट्राने कोकण रेल्वेच्या उभारणीत २२ टक्के आर्थिक वाटा उचलूनही किमान सुविधांसाठी संघर्ष करावा आणि इतर राज्यांना सहजासहजी गाड्या मिळाव्यात असाच रेल्वेचा हेका दिसतोय. सर्व प्रवासी संघटनांनी एकत्र येऊन याचा निषेध केला पाहिजे.
–अक्षय महापदी, रेल्वे विषयक अभ्यासक,कळवा, ठाणे.