अमेरिकेत पुराचे थैमान ; ४३ जणांचा मृत्यू ; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू!

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात ग्वाडालुपे नदीला आलेल्या पुराने थैमान घातले आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या या जलतांडवात 43 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 15 मुलांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून पुरातून आतापर्यंत 850 जणांची सुटका करण्यात आली आहे.
टेक्सासमधील केर काउंटीचे पोलीस अधिकारी लॅरी लाथा यांनी म्हटले आहे. जोपर्यंत प्रत्येक जण सापडणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे बचावकार्य सुरू ठेवू.
उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नदीकाठावर कॅम्पसाठी आलेल्या मुलांना पुराचा फटका बसला. ख्रिश्चन युथ कॅम्पमधील 27 मुली पुरात अडकल्या आहेत आणि अद्याप त्या सापडल्या नाहीत.
सोशल मीडियावर काही पालकांनी आपल्या मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
4 जुलैरोजी पहाटेच्या सुमारास ग्वाडालुपे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. काही तासांतच पुराचे अचानक लोंढे आले आणि त्यात या भागाचे भरपूर नुकसान झाले.
या पुरात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सुरक्षितस्थळी पोहोचवत नाही तोपर्यंत हे बचावकार्य सुरू राहील अशी ग्वाही टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अबॉट यांनी दिली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. स्थानिक प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
उन्हाळी सुट्टीनिमित्त एका स्वयंसेवी संस्थेकडून नदीकाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अंदाजे 750 मुलींनी निवासी शिबिरात सहभाग घेतला होता.
आयोजकांनी पालकांना इमेल करून सांगितले आहे की जर तुमच्याशी थेट संपर्क करून माहिती देण्यात आली नसेल तर तुमचे पाल्य हरवले आहे असे समजावे. काही पालकांनी आपल्या पाल्यांच्या मृत्यूची घोषणा केली आहे.