महाराष्ट्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

ठाणे, दि. २६ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी बाबामहाराज यांच्या नेरुळ येथील निवासस्थानी भेट देवून स्व.श्री बाबामहाराज सातारकर यांची मुलगी, नातू यासह सातारकर कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही स्व. ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे जाणे, ही अतिशय दुःखद व मनाला चटका लावणारी घटना आहे. सर्वसामान्य माणसाला जगण्याचा मंत्र त्यांनी दिला. अध्यात्मिक प्रचाराबरोबरच समाज प्रबोधनाचे कामही त्यांनी केले. अध्यात्मिक मार्गातून त्यांनी सर्वसामान्य माणसाला जगण्याचा मंत्र दिला. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल होईल, त्यांचे दुःख कमी कसे होईल, हे त्यांनी साध्या सोप्या भाषेत सांगितले. आपल्या अमोघ वाणी व किर्तनातून त्यांनी राज्याबरोबरच देशविदेशातील नागरिकांना जवळ केले होते.
स्व. ह.भ.प. बाबामहाराजांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ कीर्तनकार स्व.ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.