Konkan Railway | रत्नागिरी रेल्वे स्थानकावर वैद्यकीय गरज असलेल्या प्रवाशांसाठी कक्ष तैनात
- दरड कोसळल्यामुळे अडकून पडलेल्या रेल्वेतील रुग्णांसाठी, वैद्यकीय गरज असलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेची खबरदारी
रत्नागिरी : दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक रविवारी सायंकाळपासून बंद असल्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान गाड्यांमध्ये अडकून पडलेल्या रुग्णांकरिता रत्नागिरी रेल्वे स्थानकावर वैद्यकीय कक्ष सज्ज कार्यरत ठेवण्यात आला आहे.
खेडजवळ दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रत्नागिरी येथील रेल्वे स्थानकावर देखील काल सायंकाळपासून दोन एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवासी ताटकळत राहिले होते. या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी स्थानकावर जाऊन रेल्वे प्रवाशांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत रेल्वे प्रवासात वैद्यकीय गरज असलेल्या प्रवाशांची तसेच गाड्यांमधील खोळंबा झालेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना आवश्यक असलेली वैद्यकीय मदत त्यांच्यापर्यंत पोहोचाववी, यासाठी रेल्वेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासून रत्नागिरी येथील रेल्वे स्थानकावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला आहे.