महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण | राज्यस्तरीय शुभारंभाचे रत्नागिरीतील नाट्यगृहात थेट प्रक्षेपण

  1. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह लाभार्थी महिलांची मोठी उपस्थिती

  2. रक्षाबंधनापूर्वी खात्यात पैसे जमा झाल्याने

भगिनींमध्ये उत्साहाचे वातावरण*

रत्नागिरी, दि. १७ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात झाला. या शुभारंभाचे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात थेट प्रक्षेपण झाले. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. रक्षाबंधनापूर्वी महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याने भगिनींमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, तहसिलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते.
*महिलेची आर्थिक उन्नती झाली तर जिल्हा सक्षम-पालकमंत्री*
पालकमंत्री श्री. सामंत यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, दोन महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये आधार लिंक नंतर पैसे जमा होतील. सप्टेंबरमध्ये जरी अर्ज भरला तरी महिलांच्या खात्यामध्ये तीन महिन्यांचे पैसे जमा होतील. राज्यातील महिलांचे अश्रू पुसण्याचे काम शासन करीत आहे अशी प्रतिक्रिया महिला भगिनी देत आहेत. नवऱ्याच्या पगारात घरखर्च चालविताना घरातील महिला स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करते. तिच्या आर्थिक नियोजनाला हातभार लावण्याचे पुण्याचे काम शासन करीत आहे. महिलेची आर्थिक उन्नती झाली तर कुटूंबाची होते. कुटूंबाची आर्थिक उन्नती झाली तर, जिल्हा सक्षम होणार आहे. अशा योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. नवीन लाभार्थ्यांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा. लेक लाडकी, अन्नपुर्णा, शुभमंगल, युवा कार्य प्रशिक्षण, तिर्थदर्शन आदी योजनांचा लाभही घ्यावा. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरु राहील, असे आश्वासनही पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या नाट्यगृहाच्या क्षमतेपेक्षा जास्त महिला उपस्थित आहेत. २ लाख ६० हजार अर्ज मंजूर केले आहेत. त्यासाठी ८२ कोटी रुपये वाटप होत आहेत. रक्षाबंधनापूर्वीच हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. पात्र लाभार्थ्यापैकी एकही महिला वंचित राहणार नाही असेही ते म्हणाले.

यावेळी लाभार्थी महिला, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला. आईच्या खात्यात पैसे जमा झाल्याने झेबा नाईक या मुलीने पालकमंत्र्यांना राखी बांधली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button