आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा पुरस्कारांचे वितरण
- आदर्श पिढी तयार करण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत
- जिल्ह्यातील सर्वच शाळा सुंदर बनवाव्यात – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. 26 : पालकांपेक्षा मुले शिक्षकांच्या सानिध्यात असतात. शिक्षकांचा ते आदर करतात. शिक्षक म्हणून हा आदर कायम ठेवा. भविष्यातील आदर्श पिढी तयार करण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. केवळ पुरस्कारासाठी शाळा सुंदर न करता जिल्ह्यातील सर्वच शाळा सुंदर कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
जिल्हा परिषदेमार्फत प्रतिवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील आदर्श शाळा पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्काराचे वितरण पालकमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते आज येथील मराठा भवन येथे झाले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, किरण लोहार, प्राथमिक शिक्षाधिकारी बी. एम. कासार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, प्राथमिक शिक्षकांच्यामुळेच मी उद्योगमंत्री पदापर्यंत पोहचलो, याची मला जाणीव आहे. आता शिक्षकांना कदाचित बाई ऐवजी मॅडम, गुरुजी ऐवजी सर म्हणत असतील. पण, माणसं तीच आहेत. त्यांना असणारा आदर तोच आहे. नासा, इस्त्रो सारख्या ठिकाणी शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच ग्रामीण भागातील आपले विद्यार्थी तेथे भेट देऊन आले. हे विद्यार्थी परिस्थितीने जरी गरीब असले तरी, बुध्दीने श्रीमंत आहेत, असे प्रशंसोद़्गार नासातल्या वैज्ञानिकांनी काढले. आपल्या देशाची, रत्नागिरी जिल्ह्याची शान वाढविणारे हे प्रशस्तीपत्रक आहे. याचे श्रेय शिक्षकांना जाते. माझ्यासारखाच आदर्श शिक्षक मी तयार करेन, अशी शपथ आजच्या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने घेतली पाहिजे. किमान 10 आदर्श विद्यार्थी तयार करेन, अशी देखील शपथ शिक्षकांनी घेतली पाहिजे. त्यादृष्टीने त्यांनी मार्गक्रमण करावे.
शैक्षणिक जीवनात प्राथमिक शिक्षक हा केंद्रबिंदू ठरतो. बालपणी त्यांनी केलेले संस्कार भविष्यातही उपयोगी पडतात, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, पालकांपेक्षा शिक्षकांनी सांगितलेले बरोबर आहे, अशी विद्यार्थ्यांची भावना असते. शिक्षकांनी देखील अभ्यासूवृत्तीने विविध क्षेत्रातील ज्ञान दिले पाहिजे. वयस्कर शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून सूट द्यायला हवी. 100 टक्के निकालाची अपेक्षा करताना शिक्षकांचे प्रश्न सहानुभूतीपूर्वक सोडवून, प्रशासन देखील आदर्श वाटले पाहिजे. काही शिक्षक शिक्षकी पेशाला बदनाम करत असती, जाती-पातीचे राजकरण करत असतील तर, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. शिक्षक संघटनांनीही अशा प्रवृत्तीला चाप लावला पाहिजे. त्यांच्यावर बंधने घातली गेली पाहिजेत. भविष्यातील आदर्श पिढी निर्माण करतानाच सर्व शाळा देखील सुंदर बनवाव्यात. हा पुरस्कार आदर्श शिक्षकापेक्षा मोठा असेल, असे पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले, ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारुन पारदर्शीपणे या अर्जांची छाननी केली आहे. आपल्या जिल्ह्याची गुणवत्ता ही टॉप वनमध्ये आहे. जिल्ह्यातील समृध्द परंपरा जतन करुन ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. त्यादृष्टीने शिक्षक काम करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी मेहनत घ्यायला हवी.
*सन २०२३-२४ जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार*
सुनिल आईनकर पूर्ण प्राथमिक शाळा शेनाळे, ता. मंडणगड, जयंत सुर्वे प्राथमिक शाळा पाजपंढरी, ता. दापोली, सुधारकर पाष्टे शाळा ऐनवरे, ता. खेड, पांडुरंग कदम पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मालघर नं १ ता. चिपळूण, दशरथ साळवी शाळा काजुर्ली नं.२ ता. गुहागर. उमेश डावरे आदर्श केंद्र शाळा साखरपा नं.१ ता. संगमेश्वर, विशाखा पवार कुवारबाव उत्कर्षनगर, ता. रत्नागिरी, संजना वारंग पूर्ण प्राथमिक शाळा माजळ, ता. लांजा,सुभाष चोपडे, पूर्ण प्राथमिक शाळा करक नं.१, ता. राजापूर.
*सन २०२४-२५ जिल्हा परिषद आदर्श शिक्षण पुरस्कार*
अहमद नाडकर शाळा धुत्रोली ऊर्दु, ता. मंडणगड, महेश गिम्हवणेकर, आदर्श केंद्र शाळा आसुद नं.१, ता. दापोली. संतोष बर्वे, पूर्ण प्राथमिक शाळा धामणदेवी बेलवाडी, ता. खेड, मौल्ला नदाब आदर्श शाळा मुंढे तर्फे चिपळूण, राहूल आमटे, पूर्ण प्राथमिक शाळा जानवळे नं.१, ता. गुहागर, कारभारी वाडेकर प्राथमिक शाळा आंबेड खुर्द नं.१, ता. संगमेश्वर, माधव अंगलगे आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी, ता. रत्नागिरी, उमेश केसरकर, पूर्ण प्राथमिक शाळा शिरवली नं.१, ता. लांजा,सुहास दोरुगडे पूर्ण प्राथमिक शाळा करक नं.१ राजापूर
*विशेष पुरस्कार -* कुंदा मोरे, पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पिंपळी खुर्द, ता. चिपळूण
*मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा १ २०२३-२४*
शासकीय गट – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्दे, ता. दापोली – प्रथम. प्राथमिक शाळा भोके आंबेकरवाडी, ता. रत्नागिरी – द्वीतीय. प्राथमिक शाळा हातीव नं.१, तालुका संगमेश्वर – तृतीय.
*खासगी गट -* कृष्णाजी चिंतामण आगाशे, प्राथमिक विद्यालय रत्नागिरी – प्रथम. न्यू इंग्शिल स्कूल व गुरुवर्य काकासाहेब सप्रे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स देवरुख, ता. संगमेश्वर – द्वितीय. राजापूर हायस्कूल राजापूर -तृतीय.
आदर्श शाळा पुरस्कार २०२३-२४
*कनिष्ठ प्राथमिक शाळा -* प्राथमिक शाळा रातांबेवाडी नं.२ ता. मंडणगड, प्राथमिक शाळा गावतळे , ता दापोली, प्राथमिक शाळा सुकिवली कुणबी, ता. खेड, प्राथमिक शाळा पोसरे गुरववाडी, ता. चिपळूण, प्राथमिक शाळा तळवली नं.२ गुहागर, प्राथमिक शाळा हरपुडे नं.२, ता. संगमेश्वर, प्राथमिक शाळा पावस नालेवठार, ता. रत्नागिरी आणि प्राथमिक शाळा वायंगणी, रत्नागिरी, प्राथमिक शाळा भडे न.३, लांजा, प्राथमिक शाळा सागवे कात्रादेवी, ता. राजापूर.
*वरिष्ठ प्राथमिक शाळा -* पूर्ण प्राथमिक मराठी शाळा बामणघर, ता. मंडणगड, पूर्ण प्राथमिक शाळा मळे, ता. दापोली, पूर्ण प्राथमिक शाळा चाटव, खेड, पूर्ण प्राथमिक शाळा बोरगाव नं.१, ता. चिपळूण, पूर्ण प्राथमिक शाळा जानवळे नं.१, ता. गुहागर, पूर्ण प्राथमिक शाळा पद्मा कन्या साखरपा, ता. संगमेश्वर, पूर्ण प्राथमिक शाळा नाखरे कालकरकोंड ता. रत्नागिरी, पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा रावारी, ता. लांजा, पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा करक नं.१, ता. राजापूर.
कार्यक्रमास शिक्षक,शिक्षकी, विद्यार्थी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.