लांजात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वन विभागाला यश
लांजा : लांजा शहरात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वन विभागाला यश आले आहे. एक तासाच्या बचाव कार्यानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आलं आहे.
आज मंगळवारी सकाळी लांजा शहरातील संतोष लिंगायत यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर वन विभागाचे पथक दाखल झाले होते. स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. विहिरीमध्ये पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
वैद्यकीय तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. तपासणी करून या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनपाल श्री फकीर यांनी सांगितले. या बचाव कार्यावेळी वनरक्षक श्री. बाबासाहेब ढेकळे उपस्थित होते. या घटनेमधील बिबट्या तीन वर्षाचा आहे.