भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर

- येत्या 15 दिवसांत भाजपाचे आणखी 50 लाख सदस्य नोंदविण्याचे लक्ष्य
मुंबई : संघटन पर्वाअंतर्गत महाराष्ट्र भाजपाने 1 कोटी सदस्य नोंदणीचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. येत्या 15 दिवसांत आणखी 50 लाख सदस्य नोंदवून दीड कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य साध्य केले जाईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त केला. यासाठी आपण 13 फेब्रुवारीपासून कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत राज्याचा दौरा करणार असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. 1 कोटींचा टप्पा भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे, जनतेच्या आशीर्वादामुळे गाठू शकलो असेही त्यांनी नमूद केले.