मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज : शीतल पाटील

- फाटक हायस्कूलमध्ये ‘ना. उदय सामंत’ प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यानातून जनजागृती
रत्नागिरी : मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज आहे. पोलिस विभाग मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी केले.
ना. उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘विद्यार्थी – दशा आणि दिशा’ या विषयावर रत्नागिरीतील फाटक हायस्कूल व गांगण, केळकर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आयोजित व्याख्यानाप्रसंगी पाटील बोलत बोत्या. मुलींनी स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेतानाच मोबाईलचा अतिवापर टाळणे, अमली पदार्थ तसेच व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, सायबर पोलिस ठाण्याचे अधिकारी, शिवसेना महिला तालुकाप्रमुख कांचन नागवेकर, माजी नगरसेविका स्मितल पावसकर आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
सायबर पोलिस ठाण्याचे दशरथ कांबळे यांनी ऑनलाइन गेम आणि सोशल मीडियाचा वापर करून घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांबाबत पाॅवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नेट बँकिंगमध्ये होणारी फसवणूक थांबवण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत अजिंक्य ढमडेरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मितल पावसकर यांनी तर आभार दिनेश नाचणकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया रानभरे यांनी केले.