जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करावे

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे मुख्यमंत्र्याना पत्र
मुंबई : जगद्गुरू रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रानुसार ना. नितेश राणे यांनी म्हटले आहे की, रत्नागिरी येथील नाणीज येथील दक्षिण पिठाचे रामानंदाचार्य जगद्गुरू संत श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे आध्यात्मिक तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजजागृतीचे कार्य अविरत सुरू असून, महाराष्ट्रासह संपूर्ण राष्ट्राला याचा अभिमान आहे. गेल्या अनेक दशकांपासून त्यांच्या निःस्वार्थ सेवा आणि समर्पित प्रयत्नांमुळे समाजावर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यांनी दोन पिढ्यांना धार्मिक प्रेरणा दिली असून समाजात नैतिक मूल्यांची जपणूक केली आहे.
महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी तसेच लोककल्याणासाठी त्यांनी केलेली कार्ये अत्यंत अनन्यसाधारण आहेत. त्यांच्या आयुष्यभराच्या आध्यात्मिक साधनेसाठी व समाजसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार देणे हे निश्चितच गौरवाचे ठरेल, अशा शब्दांत ना. नितेश राणे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली असून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचा कार्याचा गौरव केला आहे.