ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

लाडघर समुद्रकिनारी सायकल, धावणे, बैलगाडी शर्यत उत्साहात संपन्न

दापोली : दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघर तालुका दापोली तर्फे दरवर्षी होणाऱ्या सायकल, धावण्याच्या आणि बैलगाडी शर्यती रविवारी ७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी लाडघर बीच येथे उत्साहात संपन्न झाल्या. हे स्पर्धेचे ५९ वे वर्ष होते. या सायकल शर्यतीत पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक अनुक्रमे प्रशांत पालवणकर, केतन पालवणकर आणि अक्षय मंडपे यांनी पटकावला.

धावणे मोठया गटात अथर्व बरजे, आयुष बरजे, रोशन राऊत आणि धावणे लहान गटात श्रेयांग मोरे, रुद्र बोरकर, वीर नरवणकर यांनी क्रमांक पटकावले. बैलगाडी शर्यतीत रुद्र सुबोध बोरकर, सचिन जाधव, प्रदीप नार्वेकर, नितेश बोरकर यांनी क्रमांक पटकावले.

लाडघर दत्त मंदिर येथे साजऱ्या होणाऱ्या दत्तजयंती निमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघर याचे अध्यक्ष दिपक बोरकर, उपाध्यक्ष निलेश मोरे आणि सचिव राजन संनकुळकर यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की १९६५ पासून या मंडळातर्फे सायकल, धावण्याच्या आणि बैलगाडी शर्यती आयोजित केल्या जात आहेत. यातील शर्यतीचे अंतर २ किमी आहे, परंतु लाडघर समुद्र किनाऱ्यावर वाळूमध्ये वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सायकल, बैलगाडी चालवणे किंवा धावणे हे आव्हानात्मक असते. सुक्या वाळूमध्ये सायकल, बैलगाडी रुतते किंवा जास्त वेगाने पळत पण नाही. त्यामुळे दरवर्षी ही अटीतटीची ही स्पर्धा होते. ही शर्यत पाहण्यासाठी आणि त्यामध्ये भाग घेण्यासाठी भरपूर गर्दी जमते.

यावर्षी या शर्यती सुरळीत पार पडाव्यात यासाठी अभिनय कर्देकर, वृषाल सुर्वे, सुभाष पेडणेकर, उदय पेडणेकर, वैभव कर्देकर, विक्रांत नरवणकर आणि लाडघर ग्रामस्थांनी बहुमोल सहकार्य केले. सर्व विजेत्यांचा बक्षीस आणि चषक देऊन सत्कार करण्यात आला. या विजेत्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करुया, मैदानी खेळ खेळूया, पर्यावरण जपुया आणि आपले आरोग्य तंदुरुस्त बनवूया असे आवाहन दत्त सांस्कृतिक मंडळाने केले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Back to top button