मुंबई, दि. २ जून २०२६ : NEET आणि CBSE परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने आज दादर येथे भव्य “युवा आक्रोश मोर्चा”काढण्यात आला.
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी आयोजित केलेल्या या मोर्चाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी केले.
चैत्यभूमी, दादर येथून शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेला हा मोर्चा पोलिसांनी अडवला आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या मोर्चात काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री नसीम खान, आ. भाई जगताप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत यांच्यासह शेकडो विद्यार्थी, युवक आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य आज धोक्यात आले असून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांच्या अपेक्षा धुळीस मिळत आहेत. केंद्र सरकार या गंभीर प्रश्नावर अपयशी ठरले असून पंतप्रधान कमकुवत असल्यानेच देशभरात पेपरफुटीचे रॅकेट फोफावत आहेत. शिक्षण व्यवस्थेतील या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
