१५ नोव्हेंबर रोजी दापोली विंटर सायक्लोथॉनचे दहावे पर्व; दापोली होणार सायकलमय!

Team RatnagiriLive
2 Min Read

दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ५:३० वाजता दापोली विंटर सायक्लोथॉन २०२६, सिझन १० स्पर्धेचे आयोजन सोहनी विद्यामंदिर मैदान दापोली येथे करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील अनेक नावाजलेले सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत. ही सायकल स्पर्धा ३० आणि ५० किमी अंतराची असून ती पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.

५० किमी कोस्टल सिनिक रुट सायक्लोथॉन मार्ग सोहनी विद्यामंदिर दापोली ते करजगाव, परशुराम भूमी बुरोंडी, तामसतीर्थ, लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, पाळंदे, हर्णै, आसूद, दापोली असा समुद्रकिनाऱ्यावरील गावातून असेल. ३० किमी सायक्लोथॉन मार्ग सोहनी विद्यामंदिर दापोली ते लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, आसूद, दापोली असा असेल. राईड मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, बॅकअप टेम्पो, मेडिकल मदत असेल. हे स्पर्धेचे दहावे पर्व असून आतापर्यंत झालेल्या ९ पर्वामध्ये संपूर्ण देशातून आणि परदेशातूनही अनेक स्पर्धक सहभागी होऊन गेलेले आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेकजण आपापल्या कुटुंबासह दापोलीत काही दिवस मुक्कामासाठी येतात. येथील पर्यटन स्थळांना भेटी देतात, स्थानिक पदार्थ वस्तू खरेदी करतात, मासे कोकणी जेवणाचा आस्वाद घेतात. देश विदेशात सायकलिंग केलेल्या या सर्वांचे प्रेरणादायी अनुभव ऐकणे, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणे नक्कीच पर्वणी असणार आहे.

सायक्लोथॉनसाठी आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी लिंक https://forms.gle/W6VhbXD7YTa7w39Z6 आहे. नोंदणी करण्याची अंतिम तारीख ५ नोव्हेंबर असेल. सायकल बिब नंबर १४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी मिळतील. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ८७६७२८५८२७, ९०२८७४१५९५ हे आहेत. सर्वांनी सराव सुरु करुया आणि आपल्या कुटुंबियांसमवेत यामध्ये सहभागी होत सायकल चालवूया व शारीरिक मानसिक आरोग्य तंदुरुस्त करुया असे आवाहन दापोली सायकलिंग क्लब तर्फे करण्यात आले आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment