श्री देवी करंजेश्वरीचा चिपळूणमध्ये आज अर्चा महोत्सव
विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
चिपळूण : शहरातील गोवळकोट, पेठमाप, मजरेकाशी येथील ग्रामदैवत श्री देव सोमेश्वर, श्री देवी करंजेश्वरी देवस्थानतर्फे आज दि. १५ फेब्रुवारी रोजी श्री देवी करंजेश्वरीचा अर्चा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमीत्त विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
गोवळकोट येथील गोविंदगडाच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात श्री देवी करंजेश्वरीचे मंदिर वसले आहे. श्री देवी करंजेश्वरीचा जन्मोत्सव म्हणून हा अर्चा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षीही विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर होणार आहेत. बुधवारी सकाळी ८.३० वाजता निहार पटवर्धन व सौ. आदिती पटवर्धन यांच्या हस्ते श्रींवर अभिषेक, सकाळी ११ वाजता महाआरती, दुपारी १२ वाजता निहार पटवर्धन व सुरेश शिंदे यांच्या मार्फत महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता पेठमाप येथील श्री जिव्हेश्वर महिला भजन मंडळाचे भजन, सायंकाळी ५ वाजता श्री. कालिकामाता महिला मंडळाचे भजन, ६ वाजता सार्वजनिक हरिपाठ, ७ वाजता सातारा येथील कीर्तनकार ह.भ.प. धनंजय चव्हाण महाराज यांचे कीर्तन, रात्री १० वाजता रत्नागिरी येथील समर्थ कृपा प्रोडक्टशनचा ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ हा करमणूकपर कार्यक्रम होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव सोमेश्वर, श्री देवी करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष ऍड. प्रसाद चिपळूणकर यांनी केले आहे.