मच्छीमारांसाठीची सागर परिक्रमा यात्रा आज रत्नागिरीत
भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून आयोजन
रत्नागिरी : गुजरातमधून सुरू झालेला मच्छीमार व मत्स्यव्यवसायिक यांच्यासाठीचा सागरी परिक्रमा कार्यक्रम आज सायंकाळी रत्नागिरीत होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील अभियान अंतर्गत हा कार्यक्रम होत आहे.
सागर परिक्रमा कार्यक्रम-2023 (तृतीय चरण) गुजरात येथून सुरू झालेल्या सागर परिक्रमा यात्रेला दि.20 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील सातपाटी येथून प्रारंभ झाला आहे. ही यात्रा “देशाची अन्नसुरक्षा, किनारपट्टीवर निवास करणाऱ्या मच्छिमारांची उपजीविका आणि सागर पर्यावरणाची सुरक्षा” या मुद्यांवर केंद्रित आहे. भारत सरकारच्या मत्स्यपालन विभागाने (Fisheries Department) ही यात्रा “आजादी का अमृत महोत्सव” चा एक भाग म्हणून आयोजित केली आहे.
या सागर परिक्रमा यात्रेचे हे पाचवे चरण उरण तालुक्यातील करंजा येथून दि.17 मे 2023 रोजी सुरू होऊन दि.18 मे 2023 रोजी रत्नागिरी येथे समाप्त होईल. ही सागर परिक्रमा यात्रा करंजा, मिरकरवाडा व मिऱ्या बंदर व स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे.
या यात्रेतून प्रगतशील मच्छिमार मुख्यत्वे किनारी भागात निवास करणारे मच्छिमार, मत्स्य शेतकरी, तरुण मत्स्य उद्योजक इत्यादींना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY), केसीसी FIDF आणि महाराष्ट्र राज्याच्या मत्स्य व्यवसाय विषयक योजनांची माहिती दिली जाईल.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री श्री.परशोत्तम रूपाला व राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी ना.उदय सामंत, जिल्ह्यातील सर्व लोकसभा सदस्य, सर्व विधान परिषद सदस्य, सर्व विधानसभा सदस्य आणि राज्य व केंद्र शासनाचे वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या परिक्रमेत राज्याचे मत्स्य अधिकारी, मच्छिमारांचे प्रतिनिधी, मत्स्यव्यवसायिक, मत्स्य उद्योजक, मत्स्यसंवर्धक, अधिकारी आणि राज्य, देशभरातील मत्स्य शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत.
किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छिमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मच्छिमार, मस्यव्यवसायाशी निगडित असलेल्या समुदायाशी आणि हितधारकांशी संवाद साधणे, हा या यात्रेचा उद्देश असून ही परिक्रमा संपूर्ण देशाच्या किनारपट्टीवरील राज्याच्या समुद्रमार्गातून जाणार आहे.
या बहुउद्देशीय सागरी परिक्रमा यात्रेचा पाचव्या चरणाच्या दि.18 मे 2023 सुरू दुपारी 4.00 ते रात्रौ 8.30 वाजेपर्यंतच्या स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर, रत्नागिरी येथील कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांनी, मत्स्य व्यवसायिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय ना. वि. भादुले यांनी केले आहे.