पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप!
रत्नागिरी : भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून मागील चार दिवस भक्तांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर लाडक्या गणपती बाप्पाला शनिवारी पाचव्या दिवशी ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्जव करीत जिल्ह्यात ठिकठिकाणी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
या पूर्वी दीड दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर शनिवारी पाच दिवसांच्या बापाला भाविकांकडून निरोप देण्यात आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या गणेश विसर्जन स्थळांवर गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शनिवारी सकाळच्या सत्रात पावसाने उघडीप घेतली होती मात्र, दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरींच्या साथीत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती करीत लाडक्या बाप्पाच्या भक्तांनी गणरायाचे विसर्जन केले.
जिल्ह्यात ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका निर्विघ्नपणे पार पाडाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासन तसेच पोलिसांकडून चौख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
संगमेश्वर तालुक्यात आरवली येथे सह्याद्रीच्या पायथ्यापासून उगम पावणाऱ्या आणि पुढे खाडीपट्ट्यातील करजुवे खाडीला जाऊन मिळणाऱ्या गडनदीच्या पात्रात भाविकांनी गौरींसह पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिला. आरवली येथे मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली असलेल्या विसर्जन घाटावर भाविकांनी शिस्तबद्धपणे विसर्जन केले. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील नव्या तसेच जुन्या फुलावरून अनेकांनी लाडक्या बाप्पाला निरोप देतानाचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये बंदिस्त केले.