हातखंबा येथे साडेपाच कोटींची विकासकामे : पालकमंत्री उदय सामंत
गावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही
रत्नागिरी : नागरिकांनी आपसातील मतभेद दूर ठेवून विकासाच्या पाठीशी उभे राहणे गरजे आहे. हातखंबा गावात साडेपाच कोटींची विकासकामे होत आहेत. गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
हातखंबा-तारवेवाडी-निवळी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपुजन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिंधुरत्न समृध्दी योजनेचे निमंत्रित सदस्य किरण सामंत, माजी जि.प. सदस्य बाबू म्हाप, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, सरपंच जितेंद्र तारवे, मुन्ना देसाई, सत्या म्हापुसकर, सागर म्हापुसकर, प्रमोद डांगे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, शासन गावाच्या विकासासाठी सकारात्मक आहे. विकास कामांच्या माध्यमातून हातखंबा गावाचा कायापालट होत आहे. सर्वांनी एकत्रित येऊन मतभेद दूर ठेवून विकासाच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मुंबई गोवा महामार्गाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल तसेच मे पर्यंत एक लेनचे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.