चिपळूणच्या युनायटेड गुरुकुलमध्ये वर्षारंभ समारंभ उत्साहात
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचलित युनायटेड इंग्लिश स्कूलचाच एक भाग असलेल्या पंचकोशाधारीत गुरुकुल विभागामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात बुधवार १९ जून रोजी वर्षारंभ समारंभाने झाली.
वर्षारंभ कार्यक्रमापूर्वी ०३ जूनपासून गुरुकुलमधील कामकाज सुरू झाले.०३ जून ते १५ जून या कालावधीत पूर्वतयारी म्हणून वाचन,पद्य गायन, चिंतन, चर्चा,मार्गदर्शन सत्र इत्यादी माध्यमातून संपूर्ण वर्षभरासाठी स्वतःच्या अभ्यासाची दिशा ठरवत विद्यार्थ्यांनी संकल्प करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली. त्याआधारे मुलांनी आपले वैयक्तिक, वर्गाचे, सामाजिक व ध्येय उद्दिष्टांना मध्यवर्ती ठेवून संकल्प ठरवले. यानंतर अनुक्रमे पाचवी,सहावी ते आठवी आणि नववी दहावी अशा तीन स्तरावर वर्षारंभ उपासना विद्यार्थ्यांनी केली.
पाचवीसाठी विद्यारंभ उपासना, सहावी ते आठवी आणि नववी दहावी साठी वर्षारंभ उपासना करत असताना उपनिषदे,स्तोत्र संग्रह, श्लोक, भगवद्गीता,गीताई आणि समर्थ रामदास यांचे साहित्य यामधील निवडक वेचक पारंपारिक साहित्याचा उपयोग करून मुलांनी मातृभूमीला पूज्य देवता मानून उपासना केली. उपासने दरम्यान मुलांनी केलेले वैयक्तिक संकल्प प्रत्यक्ष उपस्थितांसमोर जाहीरपणे सांगितले व ते संकल्प पूर्ण करण्यासाठी वर्षभर प्रयत्नशील राहण्यासाठी स्वतःला आश्वस्त केले.
वर्षारंभ उपासना संपन्न झाल्यानंतर सभा स्वरुपातील वर्षारंभ कार्यक्रम दैनिक सागर चे उपसंपादक श्री.योगेश बंडागळे, ज्ञानप्रबोधिनी चिपळूण केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. माधवराव मुसळे व सौ.स्वातीताई मुसळे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वप्नाली पाटील मॅडम, संस्था संचालक सदस्य श्री.अभयजी चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. उपासनेचा काही भाग, वर्गाचे सामूहिक संकल्प, अध्यापकांचे संकल्प,समूहगीत सादरीकरण अशा स्वरूपात झालेल्या या कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्त्यांनी आपल्या मनोगतातून मुलांनी केलेल्या संकल्पांना शुभेच्छा देत गुरुकुल रचनेत वर्षारंभ वर्षांत कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत संकल्प आणि प्रामाणिक पणे पूर्तता केलेल्या संकल्पांचे दीर्घकालीन उपयोग उपयोगिता याविषयी आपले बहुमोल विचार मांडले.