‘अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला’
- लांजा तालुक्यात सुगरणीच्या खोप्यांनी वेधले पक्षी प्रेमींचे लक्ष!
लांजा : लांजा तालुक्यात भात शिवाराच्या बाजूला सुगरण पक्षांचं आकर्षक, सुंदर घरटी (खोपा) सध्या लक्ष वेधून घेत आहेत. तळवडे, आसगे गावात खैर, शेवरीच्या झाडांवर सुगरण पक्षांची घरटी ही ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या ‘खोपा’ या जुन्या काळातील कवितेची आठवण करून देत आहेत. याआधी लांजात दुर्मिळ शेकरू, धनेश पक्षी अशा कोकणच्या समृद्ध निसर्ग संपदेचे संकेत म्हणता येतील,असे घटक पाहायला मिळाले आहेत. त्यात आता सुगरणीच्या खोप्यांनी देखील लक्ष वेधून घेतले आहे.
सुगरणीच्या विणीचा हंगाम सुरू असल्याने आणि खरीप हंगाम भात, नाचणी पिक तयार होऊ लागले आहे. खोप्यामधी खोपा…’ची ग्रामीण भागात प्रचिती येत आहे. पक्षी हे पाऊस, हिवाळा संरक्षण मिळण्यासाठी सर्व पक्षी घरटी तयार करतात. यात सर्वाधिक आकर्षक घरटे असते ते सुगरणीचे. मोठ्या कष्टातून आखीव व रेखीव कामातून पिल्लांसाठी तयार केलेले खोपे आकर्षण ठरत आहेत.
ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात, ‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला’ या ओळीची प्रचिती या खोप्यांकडे पाहून येत आहे. पक्ष्यांना पावसाळ्यात, हिवाळ्यात उबदार घरट्यांची गरज असते. ग्रामीण भागात उंच बाभळी, खैर व शेवर बोरीच्या झाडावर सुगरिणीचे घरटे दिसत आहे. विज्ञान युगात प्रगती केलेल्या मानवाला हाताने अथवा यंत्राच्या साहाय्यानेही सुगरिणीच्या घरट्यासारखी वीण करता येणे अशक्य असते. त्यामुळे आता मानवानेदेखील आपल्या घराच्या सजावटीत या खोप्यांचा वापर करण्यास सुरवात केली आहे. काटेरी झाडांच्या फांदीला असलेले पक्ष्यांचे घरटे साधारणतः दीड ते दोन फूट उंचीचे असते. घरट्याच्या तळाशी प्रवेश करण्यासाठी जागा असते. आतमध्ये सहा ते आठ फूट इंच उंचावर गेल्यानंतर गोलाकार भागात अंडी घालण्यासाठी खोलगट भाग असतो. त्याच ठिकाणी पिल्ले जन्माला येतात. खोलगट भागामुळे पिल्लांना उडता येईपर्यंत बाहेर पडता येत नाही. गवत काडीपासून तयार केलेला सुगरणीचा खोपा म्हणजे वीणकामांचा अद्वितीय नमुनाच असतो. मध्यम, लहान आकाराचे, थव्यांनी राहणारे, लालसर पिवळ्या रंगाचे सुगरण व वीणकर पक्षी आखूड, जाडसर व टोकदार चोचीचे, तसेच लहान पायाचे असतात. धान्य, फळे हे त्यांचे प्रमुख अन्न आहे.
सद्यस्थितीत शेतशिवार हिरवाईने नटलेले आहे.ग्रामीण व शहरातील अनेक झाडांवर तयार केलेले हे खोपे पाहण्यासाठी चिमुकले व नागरिक गर्दी करीत आहेत.पक्ष्यांनी तयार केलेल्या या घरकुलाकडे जाण्या येणारे निसर्गप्रेमी लोक कौतुकाने पाहत आहेत. शेत शिवारात दिसून येणारी सुंदर घरटी काहीजण झाडांवरून काढून घराच्या सजावटीसाठी वापरत आहेत. मानवाच्या या अतिक्रमणामुळे निसर्गातील असामान्य दुर्मीळ कला कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.