एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात मराठी भाषा पंधरवडा साजरा
कवयित्री संगीता अरबुने यांची काव्यमैफल
रत्नागिरी : नवनिर्माण संस्था संचलित एस पी हेगशेट्ये महाविद्यालयात मराठी भाषा पंधरवडा नुकताच पार पडला. या पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. मराठी भाषेची समृद्धी तळागाळात पोहचवी, यादृष्टीने या पंधरवड्याचे मराठी विभागातर्फे आयोजन करण्यात आले होते. कवयित्री संगीता अरबूने यांच्या ‘स्वतःला आरपार ओवताना’ या काव्य मैफलीने या पंधरवड्याचा समारोप झाला.
दि. २० रोजी भाषा संचनालय आणि मराठी विभाग यांच्यातर्फे ३६ जिल्हे ३६ व्याख्यानं या उपक्रमाअंतर्गत प्रा. राजरत्न दवणे यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील साहित्यिकांच्या वाङ्मयाचा आढावा या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर दिनांक २२ रोजी अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष प्रा. भारत सासणे यांची मुलाखत पार पडली. ही मुलाखत दूरदर्शनचे जयू भाटकर यांनी घेतली. या मुलाखतीतून प्रा. सासणे यांचा साहित्यिक जीवनप्रवास उलगडून दाखविण्यात आला. त्यानंतर दि. २८ रोजी स्वतःला आरपार ओवतांना हा कवयित्री संगीता अरबूने यांच्या काव्यमैफलीचा कार्यक्रम सादर झाला. या मैफलीनंतर मराठी भाषा पंधरवडा कार्यक्रम समारोप झाला.
दरम्यान, मराठी विभागातर्फे दि. २७ रोजी विद्यार्थ्यांच्या स्वरचित कविता वाचनाचा कार्यक्रम पार पडला. याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर दि. २५ रोजी निवडक साहित्यकृतिचे वाचन हा विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याचा कार्यक्रम पार पडला.
सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुकुमार शिंदे, प्रा. डॉ. पूजा मोहिते, प्रा. सचिन टेकाळे, प्रा. योगेश हळदवणेकर यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.