आषाढी एकादशीला असंख्य भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन!

राजापूर : आषाढी एकादशी निमित्त रविवारी येथील श्री विष्णू पंचायतन मंदिरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात श्री विठ्ठल आणि राई-रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी मोठी केली होती.
बाजारपेठेतील इतिहास कालीन असलेल्या या मंदिरात दरवर्षी आषाढी आणि कार्तिकीला भाविकांची गर्दी होत असते. आषाढी वारीला पंढरपुरला जाऊ न शकणारे वारकरी भाविकांबरोबरच अनेक भाविक या दिवशी या ठिकाणी पाडुरंगाचे दर्शन घेतात.
आषाढी एकादशी निमित्त पहाटे मंदिरात सौ. व श्री. अक्षय पोकळे यांच्या हस्ते श्री विठ्ठलावर अभिषेक, पूजा आरती करण्यात आली. त्यानंतर दिवसभर राजापूर शहरासह तालुका भरातून आलेल्या भाविकांनी श्री विठ्ठलासह राई रखुमाईचे दर्शन घेतले.
दुपारी वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष रविंद्र नागरेकर आणि वारकरी मंडळाचे वारकरी भजन आणि बाजारपेठेतील महिला मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी प्रथेप्रमाणे विठ्ठल मंदिरापासून भक्त पुंडलीक मंदिर व परत विठ्ठल मंदिर अशी दिंडी काढण्यात आली.
या दिंडीत वारकरी संप्रदायासह विविध संप्रदायाचे सदस्य, भक्त वत्सल भक्तिभाव पडळाचे पदाधिकारी आणि भाविक सहभागी झाले होते. त्यामुळे रविवारी राजापूर बाजारपेठ विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेल्याचे पाहायला मिळाले. रात्रौ महाआरतीने उत्सवाची सांगता झाली.