पुण्याच्या मॅक इंस्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांची पैसा फंड कलादालनाला भेट
कलादालन पाहून विद्यार्थी भारावले
संगमेश्वर : पुणे येथील मॅक इंस्टिट्यूट येथे ॲनिमेशनचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वरच्या पैसा फंड कलादालनाला भेट देवून येथील कलाकृती आणि शिल्पांची पहाणी केली. शालेय स्तरावर अशा प्रकारचे कलादालन आपण प्रथमच पहात असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि कलाकारांची कला पाहून आपण भारावून गेल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
मॅक इंस्टीट्यूट पुणे येथे ॲनिमेशनचे शिक्षण घेणारे विद्यार्थी श्रीधर पाटील ( कोल्हापूर ) ,वेदांत मेडपालवार ( नांदेड) , ज्ञानेश्वर राजेगोरे ( नांदेड), नागराज पोळ ( बिजापूर , कर्नाटक ), अंकिता सुर्वे ( जयगड ), हेमंत सावंत ( संगमेश्वर ) यांनी आज संगमेश्वर येथे आले असता आवर्जून पैसा फंड कलादालनाला भेट दिली. पैसा फंडच्या कलाविभागा तर्फे या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कलाविभागाच्या ‘ कलासाधना ‘ या उपक्रमाची सविस्तर माहिती घेऊन यातील विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून हे विद्यार्थी अचंबित झाले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची कला विषयातील प्रगती कला महाविद्यालयातील मूलभूत अभ्यासक्रमा एवढी असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
संगमेश्वर हे जरी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असले तरीही पैसा फंड प्रशालेत येणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येणारे आहेत. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा व्यापारी पैसा फंड संस्थेचा कलादालन हा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊनच्या काळात कलादालन उभारण्यात महत्वाची भूमिका घेणारा पैसा फंडचा माजी विद्यार्थी हेमंत यशवंत सावंत याने मॅक इंस्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांना कलादालनाबद्दल सविस्तर माहिती दिली .