रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

कोकण रेल्वे मार्गावरही धावणार वंदे भारत एक्स्प्रेस !

रत्नागिरी : मुंंबई-गोवा रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असून, कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी मुंबई येथे दिल्याची माहिती भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.
कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत भाजपाच्या आमदारांनी भेट घेतली. या आमदारांमध्ये प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, प्रसाद लाड आदींचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी कोकणातील प्रवाशांसाठीचे विविध मुद्दे मांडले.
कोकणातील प्रवाशांचा प्रवास वेगाने होण्यासाठी शिर्डी व सोलापूरप्रमाणेच गोव्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी  आमदारांनी केली. त्यावेळी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे आश्वासन राज्यमंत्री दानवे यांनी दिले. वन प्रॉडक्ट, वन स्टॉल प्रकल्पानुसार कोकण रेल्वेतील प्रकल्पग्रस्त व्यक्ती वा त्यांच्या वारसांना स्टॉल द्यावेत, शेतकर्‍यांसाठी प्रत्येक स्थानकात फिरता स्टॉल असावा, कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांतील प्लॅटफॉर्मवर गाडीमधील उंची समान ठेवावी, रेल्वे पुलामुळे महाड येथे पूरस्थिती निर्माण होत असल्याबद्दल उपाययोजना करावी, रत्नागिरी-दिवा ट्रेन दादरपर्यंत न्यावी, रेल्वेमार्गालगत रेल्वेच्या जागेवर वसलेल्या घरांमधील रहिवाशांचे एसआरए प्रकल्पात पुनर्वसन करण्यासाठी रेल्वे जमिनीचा एफएसआय द्यावा, कोकणातील लोटे परशुरामसह विविध एमआयडीसी ते रेल्वेस्थानकापर्यंत लाईनसाठी प्रस्ताव तयार करावा, जनशताब्दी, तेजस आणि गरीब रथ गाड्यांना खेड रेल्वे स्थानकाचा थांबा द्यावा, आदी मागण्या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करण्यात आल्या. त्यावर त्यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button