मनोज सुतार यांच्या कलाकृती जहांगीर आर्ट गॅलरीत झळकल्या!
- १५ डिसेंबरपर्यंत प्रदर्शन खुले
- अंतर्मनाला साद घालणाऱ्या कलाकृती
संगमेश्वर : कोकणच्या निसर्गावर निस्सीम प्रेम करणारे कबनूर इचलकरंजी येथील चित्रकार मनोज सुतार यांच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई याठिकाणी १५ डिसेंबर पर्यंत ” प्रतिबिंब ” या नावाने प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या कलाकृतीं मध्ये कोकणातील कलाकृतींचाही समावेश आहे.
जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे रिफ्लेक्शन या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन गिरगाव आर्ट कॉलेजचे प्राध्यापक महावीर पाटील , जहांगीर आर्ट गॅलरीच्या सचिव मेनन मॅडम व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. सदर प्रदर्शन १५ डिसेंबर पर्यंत हिरजी जहांगीर आर्ट गॅलरी येथे सकाळी ११ ते सायंकाळी सात या वेळेत सुरू असणार आहे.
चित्रकार मनोज सुतार संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांना गुरुस्थानी मानतात. परीट यांच्याकडे चित्र रेखाटनाच्या निमित्ताने आल्यानंतर सुतार यांना कोकणचा निसर्ग नेहमीच साद घालत असे. परीट आणि सुतार यांनी अनेकदा हा सर्वांगसुंदर निसर्ग आपल्या कुंचल्यातून हुबेहूब साकारला आहे. यातूनच चित्रकार मनोज सुतार यांना जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरविण्याची उर्मी निर्माण झाली. गुरुवर्य विष्णू परीट यांनी यासाठी त्यांना शुभेच्छा देत पाठबळ दिले. ” प्रतिबिंब ” या नावाने आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्याचे मनोज सुतार यांचे स्वप्न साकार झाले.
या कलाकृतींमधून केवळ दृश्यानंद नव्हे तर अंतर्मनाशी संवाद साधण्याची अनुभूती मिळेल. यामध्ये आपण आपल्या अंतर्मनाला सामोरे जाण्याची आणि जगाला एका नवीन दृष्टीने पाहण्याची संधी मिळवू अशा भावना इचलकरंजीतील चित्रकार सुतार यांनी व्यक्त केल्या आहेत. सुतार यांचे आतापर्यंत विविध ठिकाणी चित्र महोत्सव झाले आहेत. कोल्हापूर कला महोत्सव, ठाणे कला महोत्सव, बेळगाव कला महोत्सव, नेहरु सेंटरमध्ये प्रदर्शने झाली आहेत. शिवाय चित्रांची प्रात्यक्षिकांच आयोजनही विविध शहरात केले आहे. जीडी आर्ट आणि आर्टमध्ये मास्टर पदवी घेतलेल्या सुतार यांची विविध माध्यमात चित्र रेखाटण्याची खासियत आहे.
चित्रकृतीमागील भावना मांडताना सुतार म्हणाले, कला ही मनाच्या गाभ्याचा आरसा असते, जी मानवी भावना, विचार, आणि अनुभव यांचे प्रतिबिंब दाखवते.रिफ्लेक्शन या संकल्पनेवर आधारित हे चित्रकला प्रदर्शन आपल्याला स्वतःकडे, समाजाकडे आणि निसर्गाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देते. प्रत्येक कलाकृतीतून व्यक्त झालेल्या प्रतिबिंबांचा अर्थ शोधणे म्हणजे आपल्याच मनाचा शोध घेणे. या प्रदर्शनातील चित्रांमध्ये पाण्यावरील प्रतिबिंबांपासून अंतर्मनातील विचारांपर्यंत, वेगवेगळ्या स्वरूपांतील प्रतिबिंब मांडली आहेत.