युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागात निवासी शिबिर आणि वर्षारंभ समारंभ संपन्न

चिपळूण : गुरुकुल विभागात निवासी शिबिर आणि वर्षारंभ समारंभ संपन्नपरशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणच्या पंचकोशाधारीत गुरुकुल विभागामध्ये पाचवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांचा वर्षारंभ समारंभ संपन्न झाला.
गुरुकुलात आयोजित केलेल्या वर्षभरातील पहिल्या निवासी वर्गाची सुरुवात वर्षारंभ उपासनेने झाली. गुरुकुलात होणाऱ्या विविध व्यक्तिमत्व विकसनकेंद्री उपक्रमांची सुरुवात आपण वर्षभर नेमके काय काय करायचे आहे असे ठरवून करावी म्हणून अभ्यास, शारीरिक सुदृढता, कला कौशल्य, कुटुंब अशा सगळ्याचा विचार करून या सगळ्याशी जोडले जाणारे छोटे छोटे संकल्प म्हणजे निश्चय विद्यार्थ्यांनी प्रकटपणे वर्षारंभ उपासनेनंतर आपल्या संकल्प सादरीकरणात उपस्थितांसमोर मांडले. वैयक्तिक आणि गटाचे संकल्प अशा स्वरूपातली ही मांडणी विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला नेमकेपणा आणणारी होती.
तत्पूर्वी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा विद्यारंभ उपासना संस्कार आणि इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलांचा वर्षारंभ उपासना संस्कार वेद,पुराण,उपनिषदातील प्रसंगोचित निवडक श्लोक म्हणत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अभ्यागत म्हणून अलोरे हायस्कूल अलोरे या प्रशालेत दीर्घकाळ तंत्रशिक्षण अधिव्याख्याता म्हणून सेवा बजावून निवृत्त झालेले श्री.शशिकांत वहाळकर सर उपस्थित होते.संगीतमय पद्य उपासने सोबत विद्यार्थ्यांनी सामूहिक गद्य संकल्प सांगून झाल्यावर झालेल्या सभेच्या कार्यक्रमात यावर्षी इयत्ता दहावीच्या माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान गुरुकुल विभागातर्फे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विभाकर वाचासिद्ध सर आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी गुरुकुलच्या स्थापनेनंतर पहिला प्रवेश झालेली आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेत गुरुकुल विभागात प्रथम क्रमांक मिळवणारी कु.कनक म्हापुसकर हिने आपल्या मनोगतातून गुरुकुलच्या सहवासाने तिच्यात झालेले आमुलाग्र बदल सांगितले तसेच कनक चे पालक प्रसाद म्हापुसकर आणि गुरुकुलात इयत्ता दहावी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेल्या वेदांत खरे याच्या पालकांनी आपल्या मनोगतातून मुलांचे यश हे निव्वळ गुरुकुलमधील संस्कार, गुरुकुलची उपक्रमाधारित अभ्यास पद्धत आणि अध्यापकांचे आत्मियतेने योगदान याचे यश आहे असे आवर्जून सांगितले.गुरुकुल मधील दहावीच्या पहिल्या तुकडीतील मुलांच्या यशासाठी अध्यापकांनी केलेल्या विशेष प्रयत्नाचे कौतुक गुरुकुल विभागाच्या पालक संघ कार्यकारिणीकडून भेटवस्तू देऊन करण्यात आले.वर्षारंभ कार्यक्रमासाठी प्रमुख अभ्यागत श्री. वहाळकर सर यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंगांचे दाखले गोष्टी आणि कविता रूपात देत संकल्प करणे का आणि कसे महत्त्वाचे आहे हे मुलांना आणि बहुसंख्येने उपस्थित पालकांना सांगितले.वर्षारंभ उपासनेनंतर रात्रीच्या भोजनोत्तर सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी सामूहिक चित्रपट पाहण्याचा अनुभव घेतला. ‘ उबंटू’ चित्रपट पाहताना ग्रामीण भागातील मुलांची शिकण्याची तळमळ, एकत्रित येऊन काम करण्याची भावना समजून घेत मुलांनी मध्यरात्री पर्यंत चित्रपट पाहिला.
निवासी शिबिरातील सहभागी पाचवी ते आठवीच्या मुलांना राख्या तयार करण्याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले.शनिवार दिनांक २८ जून २०२५ रोजी संपन्न झालेल्या या एकदिवसीय निवास शिबिराची सांगता दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार २९ जून रोजी सकाळच्या उपासना,प्रार्थना व्यायाम व आढावा सत्राने झाली.