चिपळूणच्या युनायटेड गुरुकुलमध्ये पहिल्यांदाच मुलांसाठी विद्याव्रत संस्कार कार्यक्रम संपन्न
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल मधील एक वेगळा शैक्षणिक प्रयोग प्रकल्प म्हणजे २०१९ मध्ये सुरु झालेला गुरुकुल विभाग. गुरुकुलातील या वर्षी प्रथमच विद्याव्रत संस्कार कार्यक्रम आयोजित करण्याचा आला होता.
विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाच्या उद्देशाने आयोजित केलेला ‘ विद्याव्रत संस्कार कार्यक्रम ‘ राष्ट्रीय सौर दिनांक अश्विन १८ शके १९४६ अर्थात गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०८.०० ते १०.३० या वेळेत संपन्न झाला. यामध्ये इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ज्ञानप्रबोधिनी पुणे आणि निगडी त्याचप्रमाणे ज्ञानप्रबोधिनीचे चिपळूण संपर्क केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या विद्याव्रत संस्कार कार्यक्रमामधून ३५ विद्यार्थी विद्यार्थिनींनी विधिव्रत
‘ विद्याव्रत ‘ आचरणात आणत राहू असा निश्चय पालकांच्या साक्षीने यज्ञकुंडांच्या समक्ष केला.
युक्ताहारविहार, इंद्रियसंयमन,दैनंदिन उपासना, स्वाध्याय प्रवचन,सद्गुरुसेवा, राष्ट्रअर्चना अशा सहा प्रमुख व्रतांचे यमनियम समजून देणाऱ्या, वेदशास्त्र परंपरा,पौराणिक साहित्य, भगवद्गीता इत्यादी मधील निवडक श्लोकांचे सोप्या भाषेत अर्थ सांगत सांगत उपासनेचा कार्यक्रम
अध्वर्यु म्हणून सौ.प्राची भावे,सौ. दिपा गद्रे आणि श्री. पराग लघाटे या अध्यापकानी मुलांना सांगितला त्याप्रमाणे व्रतार्थी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी विधिवत हा संस्कार कृतीसह समजून घेतला.
या संस्कार कार्यक्रमासाठी आचार्य म्हणून चिपळूण मधील ज्येष्ठ प्रवचनकार व संत साहित्याचे अभ्यासक श्री. धनंजय चितळे उपस्थित होते त्यांनी प्रमुख आचार्य म्हणून उपस्थीतांना विद्याव्रत या विषयी मार्गदर्शन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली पाटील मॅडम व गुरुकुल चे विभाग प्रमुख श्री.मंगेश मोनेयांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा संस्कार कार्यक्रम संपन्न झाला.
उपासनेच्या कार्यक्रमानंतर संपन्न झालेल्या सभेच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांतर्फे मैत्त्रेयी पुरोहित, वेद पवार, मोहित लटके, कनक म्हापुस्कर ,शर्वरी सावंत आणि ओजस कुंटे या मुला मुलींनी तर पालकांच्या वतीने श्री.अजित लटके, श्री सतीश कुंटे यांनी या उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.सभेचे सूत्र संचालन अध्यापिका सौ. मेधा लोवलेकर यांनी केले. गुरुकुलातू सर्वच अध्यापयांनी हा कार्यक्रम सुसूत्र होण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले