वामनराव दाते उत्कृष्ट शाखा पुरस्कारासाठी कोमसापच्या लांजा शाखेची निवड
लांजा : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रदान केले जातात. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा – लांजाने सातत्याने मराठी भाषा आणि मराठी साहित्य चळवळ वृंद्धीगत करण्यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत यावर्षी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा वामनराव दाते उत्कृष्ट शाखा पुरस्कारासाठी लांजा शाखेची निवड करण्यात आली आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई,नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अनेक शाखा कार्यरत आहेत. त्यापैकी कोमसाप रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शाखा कार्यरत आहे. तेव्हा पासून प्रत्येक वर्षी काही विशिष्ट उपक्रम शाखा राबवत असते. आजवर वाचन चळवळ वृध्दींगत होण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रसंगी जागतिक कीर्तीचे पंच्याहत्तर महामानव या संस्कारक्षम पुस्तकाचं वितरण, खुल्या गटासाठी तालुकास्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धा, काव्यमाला अंतर्गत केशवसुत यांच्या जयंतीनिमित्त काव्यवाचन, गुरुपौर्णिमा, सभासद नोंदणी, जुन्या नव्या पुस्तकांचे संकलन करून तळवडे येथील शेतकरी मंचाला पुस्तक भेट, विशेषदिनानिमित्त विविध विषयांवरील व्याख्याने आदी उपक्रम घेण्यात आले. हे उपक्रम तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय तसेच लोकमान्य वाचनालय लांजे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा समृद्धीसाठी राबविण्यात आले आहेत.
मराठी भाषा आणि साहित्य चळवळ सुरू ठेवण्यासाठी लांजा शाखेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, उपाध्यक्ष डॉ. माया तिरमारे, कार्यवाह प्रकाश हर्चेकर, सहकार्यवाह भीमराव खोत, कोषाध्यक्ष शहाजीराव देशमुख, जिल्हा प्रतिनिधी बाळू नागरगोजे, युवाशक्ती विभाग प्रमुख प्रवीण कांबळे, महिला विभाग प्रमुख सविता पाटील, जनसंपर्क प्रमुख दत्तात्रय देसाई, प्रसिद्धी प्रमुख संदेश कांबळे, कार्यकारिणी सदस्य रिया लिंगायत, मनीषा पाटील, सुधाकर कांबळे, प्रभाकर गवाणकर, नारायण कदम, काशिराम जाधव, सुलभा पोकळेकर, नसीमा मुलाणी, रामचंद्र लांजेकर, सल्लागार आदम मापारी, वसंत देसाई,गजानन जगताप,आदीं मेहनत घेत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजाला वामनराव दाते उत्कृष्ट शाखा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाखेचे सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.