सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टमध्ये वार्षिक कला प्रदर्शन
- १५ जानेवारीला प्रारंभ
- सलीम मणेरी यांना कला जीवन गौरव पुरस्कार
संगमेश्वर दि. ९ : सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेच्या सह्याद्री कॉलेज ऑफ आर्ट येथे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उदघाटन १५ जानेवारी २०२५ रोजी ११ वाजता संपन्न होणार आहे. याप्रसंगी उद्घाटक म्हणून व अध्यक्ष स्थान हे चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर गोविंदराव निकम हे भूषवणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकार बबन माने, कोल्हापूर चित्रकार संतोष पोवार कोल्हापूर. शिल्पकार संदीप ताम्हणकर.चिपळूण. ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार मा.प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, महेश महाडिक हे उपस्थित असतील.
तसेच या कला प्रदर्शनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदजी निकम कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या तसेच सामाजिक बांधिलकी जपणार्या कलाकाराला या पुरस्काराने गौरवण्यात येते यावर्षी हा पुरस्कार यावर्षी सलीम अल्लाबक्ष मणेरी कलाशिक्षक यांना दिला जाणार आहे. सलीम अल्लाबक्ष मणेरी हे अंजुमन इस्लाम उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गोरेगाव जि. रायगड येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
तसेच या कला प्रदर्शनाचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे प्रदर्शनातील कला विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहण्याचा व विकत घेण्याचा आनंद या कला जत्रेत कलारसिकांना घेता येणार आहे.या प्रदर्शनात शंभरहून अधिक कलाकारांच्या ६०० कलाकृती मांडल्या आहेत. या कलाप्रदर्शनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी कलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन व कौतुकाची थाप म्हणून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.
या प्रदर्शनाचे अजून एक खास आकर्षण म्हणजे या कला प्रदर्शनात कलाकृतींच्या आस्वादा सोबत कलारसिकांना त्या खरेदी देखील करता येणार आहेत. जिल्ह्यातील कला रसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक शिवाजी यादव यांनी केली आहे.