साई भक्तांसाठी खिचडी वाटप

- श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था आणि ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळाचा स्तुत्य उपक्रम
उरण, दि. ११: गुरुपौर्णिमेच्या पवित्र सणाचे औचित्य साधून, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोली यांनी यंदाही सामाजिक बांधिलकी जपली आहे. ॐ साई सेवा मंडळ चिरनेर आयोजित श्री साईबाबांच्या पायी पालखी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या भक्तांसाठी गव्हाण फाटा येथे साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे, ॐ साई सेवा मंडळ चिरनेरतर्फे श्री महागणपती मंदिर, चिरनेर (उरण) ते श्री साई मंदिर, वहाळ (पनवेल) दरम्यान पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे १३ वे वर्ष होते. गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता श्री महागणपती मंदिरात आरती करून ही दिंडी वहाळ येथील साई मंदिराकडे प्रस्थान झाली.
या पदयात्रेत सहभागी झालेल्या साई भक्तांना गुरुपौर्णिमा निमित्त सेवाभावी वृत्तीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटण्यात आला. यावेळी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमाचे साई भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात आले.
ॐ साई सेवा मंडळ चिरनेरने या चांगल्या आयोजनाबद्दल श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तसेच ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोलीच्या पदाधिकारी व सदस्यांचा सन्मानचिन्ह आणि शाल देऊन सत्कार केला.