रत्नागिरीवासियांच्या नाटकावरील प्रेमामुळे नाट्य क्षेत्राला नवा आयाम : पालकमंत्री सामंत

रत्नागिरी: देशात सर्वात जास्त काळ चालणारी स्पर्धा कोणती असेल, तर ती म्हणजे नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती नाट्य स्पर्धा! १८२ दिवस ही स्पर्धा सुरू राहिली. वर्ल्डकप किंवा आयपीएल सुद्धा एवढे चालत नाहीत!
रत्नागिरीकरांचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि नाटकावरील प्रेम यामुळे नाट्यक्षेत्रातला एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी काढले.
येथील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृह,रत्नागिरी येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित कोकणातील उत्सवात होणाऱ्या नाटक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास पालकमंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी त्यांनी सांगितले की, देशात सर्वात जास्त काळ चालणारी स्पर्धा कोणती असेल, तर ती म्हणजे नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती नाट्य स्पर्धा आहे.
या स्पर्धेमुळे अनेक कलाकार महाराष्ट्राच्या रंगभूमीकडे वाटचाल करत आहेत. कलाकार घडवण्याचं हे कार्य अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अत्यंत नेटाने आणि तळमळीने करत आहे, त्यासाठी संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!
यावेळी पालकमंत्र्यांनी एक सुचना केली की, कितीही नाटके झाली तरी सर्व नाटकांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग अनिवार्य करावं, जेणेकरून निवडक नाटके विविध चॅनेल्सवर प्रदर्शित करता येतील आणि संस्थांना त्यातून अधिक व्यासपीठ मिळेल.