आत्महत्या प्रतिबंध जनजागृतीसाठी दापोलीत १० सप्टेंबरला सायकल फेरी
दापोली : आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक तणावाबद्दल मोकळेपणाने बोलल्याने आत्महत्या टाळता येऊ शकते. आत्महत्येचा विचार करणाऱ्या लोकांची काही लक्षणे ओळखून त्यांचे जीवन वाचवले जाऊ शकते. याबद्दल जनजागृती करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लब आणि जेसीआय दापोली तर्फे रविवारी, १० सप्टेंबर २०२३ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:३० वाजता सुरु होईल. ती उपजिल्हा रुग्णालय, एसटी आगार, पोलीस स्टेशन, बाजारपेठ, फॅमिली माळ, बुरोंडी नाका, केळस्कर नाका, आझाद मैदान अशा ६ किमी मार्गावर असेल. समारोप आझाद मैदानात सकाळी ९:३० वाजता होईल. या सायकल फेरी दरम्यान आत्महत्येबद्दल जागरुकता आणि ती रोखण्यासाठीचे प्रयत्न याविषयक तज्ज्ञ जाणकारांचे माहितीपूर्ण सेशन होतील.
या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ९६३७९२०९२०, ८७६७२१९६१० हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.