कळंबुशी येथे शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी येथे कृषी महाविद्यालय खरवते – दहीवली येथे शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण जागृकता कार्यानुभव अंतर्गत कृषी कन्या संघाच्या विद्यार्थीनीनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबुशी येथे कृषी प्रदर्शन भरवले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावचे सरपंच सचिन चव्हाण, ग्रामसेवक संदीप शेडगे, पोलीस पाटील सौ. सोनिया चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमावेळी कृषी प्राध्यापक प्रसाद साळुंखे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कृषी प्राध्यापक श्री प्रणय ढेरे यांनी प्रास्ताविकातून नैसर्गिक शेती, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महत्त्व तसेच विपणन व यांत्रिकीकरण याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. कृषी विद्यार्थी कु. श्रेया तरळ हीने सूत्र संचालन करत कृषी विभागाच्या विषयी व प्रदर्शनाबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमात कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये विविध कृषी अवजारे व विविध कृषी नमुन्यांचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी विधायर्थिनिनी कु. गौरवी चौलकर, सेजल जाधव, आयाना, वर्षा, नक्षित्रा या सर्वांनी सहकार्य केले.यांनी एकात्मिक शेती प्रणाली, हायड्रोपोनिक्स, एक्वापोनिक्स, सेंद्रिय शेती व त्याचे महत्त्व, हरितगृह, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि ठिबक सिंचन असे विविध प्रकारचे शेतीचे प्रात्यक्षिक सादरीकरण करून विचारलेला प्रश्नांचे व शंकांचे अचूक उत्तरे दिली.
कृषी प्रदर्शनामध्ये एकात्मिक शेती,शेडनेट व पॉलिहाऊस व्यवस्थापन, दुग्धव्यवसाय,अळंबी उत्पादन,रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड तसेच प्रक्रिया उद्योग आदी विषयांवर कृषी विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गेले दोन महिने याच गावात राहून शेतकऱ्यांना चार सूत्री भात लागवड,अळंबी उत्पादन, दूधजन्य पदार्थ शासनाकडून भेटणाऱ्या विविध योजना,एकदिवसीय महिला प्रशिक्षण, फळे व भाज्यांपासून मूल्यवर्धन उत्पादन, वृक्षारोपण इत्यादी तसेच जागतिक अम्ल पदार्थ विरोधी दिन, कृषी दिन इत्यादी कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले.